इटलीतील दुर्घटना ः 18 जण बर्फाखाली अडकले
वृत्तसंस्था/ रोम
इटलीत एल्पाइन ग्लेशियरचा एक मोठा हिस्सा तुटून खाली कोसळला आहे. याच्या तावडीत सापडून किमान 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. इटलीच्या शासकीय प्रसारमाध्यमानुसार 18 लोक बर्फ आणि पर्वताच्या ढिगाऱयाखाली अडकून पडले आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच लोकांना वाचविण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. जखमींपैकी 2 जणांना बेलुनो येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर एका गंभीर जखमी व्यक्तीला ट्रेविसो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 5 जखमींना ट्रेंटो रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती नॅशनल एल्पाइन अँड केव्ह रेस्क्यू कोरच्या अधिकारी मिशेला कॅनोव्हा यांनी दिली आहे.
पुंटा रोक्कानजीक इटालियन डोलोमाइट्समधील सर्वात उंच मरमोलाडा पर्वतावरील ग्लेशियर कोसळल्याचे अल्पाइन बचाव सेवेचे प्रवक्ते वॉल्टर मिलान यांनी सांगितले. मरमोलाडा पर्वताची उंची जवळपास 11 हजार फूट आहे. मरमोलाडा पर्वतीय भागात सुरू असलेल्या बचाव मोहिमेत 5 हेलिकॉप्टर्स आणि स्निफर श्वानांची मदत घेतली जात आहे.
ग्लेशियरचा मोठा हिस्सा कुठल्या कारणांमुळे तुटला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. जून महिन्यापासून इटली उष्णतेच्या लाटेला सामोरा जात आहे. ग्लेशियर तुटण्यामागे उष्णतेची लाटच कारणीभूत असू शकते. जागतिक तापमानवाढीमुळे जगभरातील हिमखंड वितळत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी इटलीचे वैज्ञानिक एल्पाइन पर्वतांवरील ग्लेशियरला वाचविण्यासाठी त्यावर सूर्याचा प्रकार परावर्तित करणाऱया सामग्रीने आच्छादित करत आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी इटलीच्या सरकारने कॅरोसेलो टोनाले कंपनीला जबाबदारी सोपविली होती.