अरुणाचल प्रदेशमधील दुर्घटना : लष्कर, हवाई दलाकडून बचावकार्य
इटानगर / वृत्तसंस्था
अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमधील अति उंचीच्या भागात भारतीय लष्करी पथकाकडून गस्त सुरू असताना झालेल्या हिमस्खलनात 7 जवान अडकल्याची माहिती सोमवारी देण्यात आली. जवानांना वाचवण्यासाठी लष्कर आणि हवाई दलाकडून संयुक्त बचाव मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले. बचावकार्यात मदत करण्यासाठी विशेष पथके विमानातून पाठवण्यात आली आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून कामेंग सेक्टरमध्ये जोरदार हिमवृष्टीसह प्रतिकूल हवामानाची नोंद केली जात आहे. तसेच मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने वातावरणात बिघाड झाला आहे. पर्वतीय भागात सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
हिमस्खलनामुळे पर्यटकही अडकले
मनाली-लेह महामार्गावरही हिमवर्षाव आणि हिमस्खलनामुळे सुट्टीवर गेलेल्या पर्यटकांना विशेषतः सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील चार राष्ट्रीय महामार्गांसह 731 हून अधिक रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावर साचलेल्या बर्फामुळे सर्वत्र गाडय़ा अडकल्या आहेत. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याचे वृत्त आहे. वीज आणि पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
ऑक्टोबर 2021 मध्ये 5 जवानांना वीरमरण
गेल्या वषी ऑक्टोबरमध्ये उत्तराखंडमधील त्रिशूल पर्वतावर नौदलाचे पाच जवान एका मोहिमेवर असताना हिमस्खलनात अडकले होते. नंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच 2019 मध्ये सियाचीन ग्लेशियरमध्ये हिमस्खलनात 6 लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता, तर इतरत्र अशाच घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती फेब्रुवारी 2020 मध्ये सरकारने संसदेत दिली होती.