त्रिशूल पर्वतावरील चढाईवेळी उत्तराखंड-चमोली येथे दुर्घटना
चमोली / वृत्तसंस्था
उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाची दुर्घटना घडली असून नौदलाचे पर्वतारोहण करणारे एक पथक हिमाच्छादित प्रदेशात अडकले आहे. 20 सदस्यीय नौदलाचे पथक त्रिशूल पर्वतावर चढत असताना शुक्रवारी पहाटे 5.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर पाच नौसैनिक आणि त्यांच्यासोबत असलेला एक हमाल असे एकूण सहाजण हिमस्खलनात बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी दिवसभर प्रयत्न सुरू होते. मात्र, सायंकाळपर्यंत ते सापडले नव्हते.
नौदलाचे एक पथक 7 हजार 120 मीटर उंच त्रिशूल शिखर चढण्यासाठी सुमारे 15 दिवसांपूर्वी निघाले होते. शुक्रवारी सकाळी पर्वतावर चढाई सुरू केल्यानंतर त्यांना हिमवादळाचा तडाखा बसला. याचदरम्यान पाच सदस्य आणि एक हमाल हिमस्खलनात अडकले. नौदल आणि प्रशासनाने त्यांचा शोध सुरू केला, पण त्यांचा शोध लागला नाही. त्यांच्या शोधासाठी नेहरू पर्वतारोहण संस्थेतून त्रिशूल पर्वतावर एक बचाव पथकही पाठवण्यात आले आहे.