ऑनलाईन टीम / मंडी :
हिमाचल प्रदेशातील मुलींना सैन्यात जाण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय सेनेकडून अंबालामधील खरगा स्टेडियममध्ये 4 ते 14 सप्टेंबर या कालावधीत ही सैन्य भरती प्रक्रिया केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जनरल ड्यूटी ( महिला सैन्य पोलीस) च्या 99 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी मुलींना 31 ऑगस्टपर्यंत सैन्याच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावे लागतील. यासाठी सैन्याकडून अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.
सैन्य भरती कार्यालय मंडीचे निर्देशक कर्नल एम. राजराजन यांनी सांगितले की, या भरतीमध्ये हिमाचल, हरियाणा येथील मुलींना सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. या भरतीसाठी मुलींचे वय 17 ते 21 यामधील असणे आवश्यक आहे. यासह या मुली इयत्ता दहावीच्या परीक्षेत पास होण्यासह प्रत्येक विषयात 33 टक्के गुण आणि सर्व विषयांचे मिळून 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
तसेच त्यांनी मंडी, कुल्लू आणि लाहौल – स्पिती मधील मुलींना या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.