ऑनलाईन टीम / शिमला :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, शिमल्यातील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज (आयजीएमसी) रुग्णालयात लसीचा पहिला डोस दिल्यानंतर तीन डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे या भागात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लस दिल्यानंतर साधारण 10 दिवसांनी संबधित डॉक्टरांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर तिन्ही डॉक्टरांना होम आयसोलेट करण्यात आले आहे. दरम्यान, लस टोचून घेतल्यानंतर हे तीनही डॉक्टर रुग्णालयात येत होते.
ड्युटी करत असताना हे तीन ही डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले होते. आयजीएमसीचे प्राचार्य डॉ. रजनीश पठानिया यांनी सांगितले की, तीन ही पॉझिटिव्ह डॉक्टरांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. ते म्हणाले, या तिन्ही डॉक्टरांचा लसीकरणाचा अवधी पूर्ण झाला नव्हता. त्यांना दुसरा डोस दिला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.