आजारांनी तडफडत आहेत सैनिक : वेस्टर्न थिएटर कमांडच्या माजी प्रमुखाचा मृत्यू
वृत्तसंस्था /बीजिंग
भारतीय भूभागावर कब्जा करण्याचे दिवास्वप्न पाहणारे चिनी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची आक्रमक भूमिका ड्रगनला डोईजड ठरू लागली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुमारे 50 हजार सैनिक तैनात केले आहेत. कडाक्याची थंडी आणि ऑक्सिजनचे अल्प प्रमाण चिनी सैनिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. चिनी सैनिक पोटाशी निगडित आजारांना तोंड देत आहेत. चिनी सैन्याच्या सर्वात मोठय़ा पश्चिम थिएटर कमांडचे कमांडर राहिलेले झांग जुडोंग यांचा मृत्यू झाला. जुडोंग 6 महिनेच लडाखच्या आव्हानात्मक स्थितीत टिकू शकले.
9 महिन्यांमध्ये तीनवेळा चीनला वेस्टर्न थिएटर कमांडचा प्रमुख बदलावा लागला आहे. चिनी सैन्याची हीच कमांड भारताला लागून असलेल्या सीमेवर तैनात आहे.
अध्यक्षांच्या पसंतीचे अधिकारी
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी जून महिन्यात जनरल झांग यांच्या जागी क्यूलिंग यांची नियुक्ती केली होती. तर दोन महिन्यांनी वेस्टर्न थिएटर कमांडची जबाबदारी जनरल वांग हैजियांग यांना सोपविण्यात आली. डिसेंबर महिन्यात झांग जुडोंग यांना कमांडर करण्यात आले होते. झांग आणि शू हे दोन्ही सैन्याधिकारी अध्यक्षांच्या पसंतीचे जनरल होते.
चिनी गोटात चिंता
भारताला लागून असलेल्या सीमेवर तैनात सैनिक आणि कमांडरांच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीवरून चिनी गोटात चिंता आहे. जनरल झांग यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या जागी नियुक्त झालेले जनरल शू आजारी आहेत. जनरल शू यांनाही पोटाचा विकार झाला आहे. याचमुळे त्यांनी केवळ दोन महिन्यातच राजीनामा दिल्याचे समजते.
वरिष्ठ सैन्याधिकारी आजारी
सीमेवर तैनात अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कमांडर पोटाशी निगडित आजारांना तोंड देत आहेत. कमी ऑक्सिजनमध्ये कामाची स्थिती, कडाक्याची थंडी, उंचीवरील प्रदेश हे प्रतिकूल घटक आहेत. कोरोनरी हार्ट डिसिज अधिकारी आणि सैनिकांमध्ये समस्या ठरली आहे.