वार्ताहर/ कराड
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सातारा येथून बुलेटवरून साडे तीन शक्तीपीठाच्या दर्शनासाठी निघालेल्या हिरकणी रायडर ग्रुपच्या हिरकणींचे कराड शहरात लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी स्वागत केले. कोल्हापूर नाका येथील हॉटेल संगम येथे स्वागत समारंभ झाल्यानंतर हिरकणी कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या.
रस्ते सुरक्षा, स्तनाचा कर्करोग व महिला सक्षमीकरणाची जनजागृती करण्यासाठी सातारच्या हिरकणी ग्रुपच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने बुलेट चालवत साडे तीन शक्ती पीठांचे दर्शन घेण्याची मोहीम आखली आहे. रविवारी सातारा येथून या मोहिमेस प्रारंभ झाला. कोल्हापूर येथील अंबाबाईचे दर्शन, तुळजापूर, नांदेड, माहुर, वाशी, औरंगाबाद, नाशिक, वणी असा 10 जिल्हे व 24 तालुक्यातून सुमारे 1 हजार 868 किलोमीटर बाईक चालवत या हिरकणी स्तनाचा कर्करोग, रस्ते सुरक्षा व महिला सक्षमीकरण बाबत जनजागृती करणार आहेत.
टीम लिडर मनिष फरांदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या बाईक मोहिमेत अंजली शिंदे, मोना निकम-जगताप, शुभांगी पवार, अर्चना कुकडे, ज्योती दुबे, केतकी चव्हाण, भाग्यश्री केळकर, श्रावणी बॅनर्जी, उर्मिला भोजने आदी हिरकणींनी सहभाग घेतला आहे. रविवारी सातारा येथून या मोहिमेस प्रारंभ झाला. बाईक रॅली कराड शहरात आल्यानंतर गटनेते सौरभ पाटील यांच्या हस्ते हिरकणींचे कराड शहराच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मोहिम फत्ते होण्यासाठी सौरभ पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यानंतर हिरकणी कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या.