सडोली खालसा / प्रतिनिधी
हिरवडे(खालसा.), ता. करवीर गावचे अभिजीत दत्तात्रय ताम्हणकर यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली आहे. डेहराडून येथे पार पडलेल्या पासिंग आउट परेडमध्ये त्यांची लेफ्टनंट पदी निवड झाली.
अभिजीतचे प्राथमिक शिक्षण कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यालय येथून झाले. त्यांचे विज्ञान शाखेचे 12 वी पर्यंतचे शिक्षण शाहू हायस्कूल, कागल येथे झाले तर त्यांनी के.आय.टी. मधून मेकॅनिकलची पदवी घेतली आहे. त्यांना सुरुवाती पासूनच भारतीय सैन्यात भरती होण्याची ओढ होती. त्यादृष्टीने त्याने प्रयत्न सुरु केले. यू.पी.एस.सी. द्वारे घेण्यात येणाऱ्या सि.डी.एस . परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. एसएसबी बोर्ड द्वारे घेतलेल्या मुलाखतीत व मेरीटनूसार त्यांची इंडियन मिलिटरी अकॅडमी(आय. एम. ए.) साठी निवड झाली. डेहराडून येथे 18 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यावर, त्यांची मेरठ येथे जाट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट पदी नेमणूक झाली आहे.अभिजीत हे शाहू कारखाना डेप्युडी चीफ केमिस्ट दत्तात्रय ताम्हणकर यांचे सुपुत्र आहेत.
अभिजीतच्या यशामध्ये त्याचे चुलते, सोलापूर आरटीओ इन्सपेक्टर अजित ताम्हणकर, निवास ताम्हणकर(सर), विजय औतारे, जे.ए. चव्हाण, कर्नल मंडलिक, पांडुरंग थोरात व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच शाहू कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे व अध्यक्ष श्रीमंत समरजीतसिंह घाटगे यांची प्रेरणा मिळाली.