वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुचाकी निर्मितीमधील आघाडीवरची कंपनी म्हणून ओळख असणारी हिरो मोटोकॉर्पने सणासुदीच्या काळात दुचाकी विक्रीचा नवा उच्चांक प्राप्त केला आहे. सदर कालावधीत जवळपास 14 लाखाहून अधिक मोटारसायकली आणि स्कूटरची विक्री केल्याची नोंद आहे.
नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते भाऊबीजेपर्यंत तब्बल 32 दिवसांच्या कालावधीत कोरोना संकटाचा प्रभाव असतानाही इतकी भरघोस वाहन विक्री हिरोमोटोने केली आहे. मागील वर्षातील सणासुदीच्या काळात जितकी वाहन विक्री झाली होती, त्यातुलनेत चालू वर्षात 98 टक्के वाहन विक्री झाल्याचे स्पष्ट केले आहे. 2018 च्या सणासुदीच्या कालावधीत जितकी वाहने विकली गेली त्या तुलनेत चालू सीझनमध्ये 103 टक्के वाहन विक्री झाल्याची माहिती आहे. 100 सीसी स्प्लेंडर प्लस आणि एफ डीलक्स 125 सीसी मोटरसायकल ग्लॅमर आणि सुपर स्प्लेंडरसह प्रीमियम सेगमेंटमध्ये एक्सट्रीम 160 आर आदी गाडय़ांचा विक्रीत समावेश राहिला आहे.
आगामी काळातही तेजीचे संकेत
डेस्टिनी आणि प्लेजर स्कूटरला मागणी चांगली राहिली. दिवाळीपर्यंत चांगली मागणी होती व नंतरही येणाऱया काळात विक्री वाढेल, असा अंदाज आहे. यामुळे हा विक्रीचा वेग येत्या काळातही राहणार असल्याचे संकेत यावेळी व्यक्त केले आहेत.