ऑनलाईन टीम / मुंबई :
हिरे मोटोकॉर्पच्या विविध ठिकाणांवर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये 1000 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. कंपनीच्या खात्यात जो खर्च दाखवण्यात आला आहे, तो खर्च प्रत्यक्षात झालेलाच नाही, असे आयकर अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.
23 मार्च ते 26 मार्चदरम्यान आयकर अधिकाऱ्यांनी हिरे मोटोकॉर्पच्या विविध ठिकाणांवर छापेमारी केली. या छाप्यादरम्यान, अधिकाऱ्यांनी अनेक हार्ड कॉपी आणि डिजिटल डेटा तपासला. ज्यामधून अनेक संशयास्पद माहिती समोर आली. कंपनीच्या अकाऊंटमध्ये कंपनीने जो 1000 कोटींचा खर्च दाखवला आहे, तो खर्च प्रत्यक्षात कंपनीने केलेलाच नाही. दरम्यान, हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर कंपनीच्या शेअर्सवरही त्याचा विपरित परिणाम झाला आहे. कंपनीचा शेअर 6.68 टक्क्यांनी घसरुन 2219 रुपयांवर बंद झाला. अद्यापपर्यंत या प्रकरणी हिरो मोटोकॉर्पकडून कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.
हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांनी छतरपूर येथील फार्महाऊस खरेदीत केलेल्या 100 कोटींपेक्षा जास्त रक्कमेच्या रोख व्यवहारांचे पुरावेही आयकर विभागाच्या हाती लागले आहेत. त्याचाही तपास सुरू आहे.