प्रतिनिधी / सातारा :
दोन दिवसांत डेंग्यू प्रतिबंधासाठी हिवताप विभागाकडून नेमण्यात आलेल्या 13 पथकांनी सातारा शहरात सर्व्हे चे काम केले आहे. दोन दिवसांत या पथकाने शहरातील 400 घरे व 1 हजार 745 नागरिकांचा सर्व्हे केला. यापैकी 44 ठिकाणी डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या असून, त्या तातडीने नष्ट करण्यात आल्या आहेत.
शहर व उपनगरास सर्व्हे करून डेंग्यू आळ्या नष्ट करण्यासाठी आशासेविकांच्या 13 प्रशिक्षित पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाने 400 घरांना भेटी दिल्या. ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोळयांभोवती जळजळ, अशक्तपणा अशी लक्षणे आढळून आलेल्या नागरिकांच्या नोंदी पथकाकडून घेण्यात आल्या. तसेच घरातील पाण्याचे पिंप, टाक्या, फ्रीज, एसी, भंगार साहित्याची तपासणीही केली. यावेळी 44 ठिकाणी डेंग्यू आळया आढळून आल्या. या आळ्या तातडीने नष्ट करण्यात आल्या.