बेळगावऐवजी बेंगळूरमध्ये होणार : कोरोनामुळे सरकारचा निर्णय
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 7 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत बेंगळूर येथे होणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्यपणे हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये घेण्यात येते. मात्र, सरकारने कोरोना परिस्थितीचे कारण पुढे करत बेंगळूरमध्येच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर कायदा आणि संसदीय कामकाजमंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विधानसभेच्या नियमाप्रमाणे दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन घेण्यात येते. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
कोरोना परिस्थितीत देखील विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 21 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यात आले होते. मात्र, अनेक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने ते अर्ध्यावरच गुंडाळण्यात आले होते. आता पुन्हा 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.