रोमांचक आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान शेवटच्या चेंडूवर विजयी
वृत्तसंस्था// दुबई
शेवटच्या चेंडूपर्यंत अतिशय चुरशीने खेळवल्या गेलेल्या रोमांचक आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने पंजाब किंग्सचा अवघ्या 2 धावांनी पराभव केला. प्रारंभी, जैस्वाल-लोमरोर यांच्या फटकेबाजीमुळे 20 षटकात सर्वबाद 185 धावा फटकावत राजस्थानने धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात पंजाबच्या फलंदाजांनी त्याही पेक्षा धडाकेबाज फलंदाजीसह प्रतिस्पर्धी गोलंदाजांना चौफेर पिटाळून लावण्याचा सिलसिला सुरु करत सामन्याला जणू एकतर्फी स्वरुप दिलेच होते. पण, अंतिम टप्प्यात अचानक राजस्थानच्या कार्तिक त्यागीचे वादळ येथे घोंघावले आणि त्याने संघाला शेवटच्या चेंडूवर संस्मरणीय विजय संपादन करुन दिला.
विजयासाठी 186 धावांचे आव्हान असताना मयांक अगरवाल (43 चेंडूत 67), केएल राहुल (33 चेंडूत 49), मार्करम (20 चेंडूत नाबाद 26), निकोलस पूरन (22 चेंडूत 32) या पहिल्या चारही फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी करत पंजाबसाठी विजय आवाक्यात आणला. मात्र, ऐन मोक्याच्या क्षणी मधल्या फळीतील फलंदाजांनी कचखाऊ खेळ साकारला आणि राजस्थानने या संधीचे सोने करत पंजाबच्या विजयाचा घास हिसकावला.
प्रारंभी, यशस्वी जैस्वाल (49) व महिपाल लोमरोर (43) यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने 185 धावांची जोरदार मजल गाठली. अर्शदीपने 5 तर शमीने 3 बळी घेत राजस्थानला 200 धावांचा टप्पा सर करण्यापासून रोखून धरले. जैस्वालने सहकारी सलामीवीर इव्हिन लुईससमवेत (36) 54 धावांची तर लियाम लिव्हिंगस्टोनसमवेत (25) अवघ्या 28 चेंडूत 48 धावांची भागीदारी साकारली. नंतर लोमरोरने 17 चेंडूतच 43 धावांची बरसात केली. त्याच्या या धडाकेबाज खेळीत 4 षटकार व 2 चौकारांचा समावेश राहिला. अर्थात, पंजाबने शमीच्या दुहेरी बळीमुळे राजस्थानला 200 धावांचा टप्पा सर करण्याआधी रोखले.
राजस्थानच्या या डावात जैस्वालने शमीला पहिल्या षटकात सलग दोन चौकार मारत आक्रमक सुरुवात केली तर पदार्पणवीर लुईसने पोरेलला षटकारासाठी पिटाळत आपले बुलंद इरादे स्पष्ट केले. विंडीजच्या या फलंदाजाने पोरेलला स्वैर गोलंदाजीची बरीच किंमत मोजणे भाग पाडले. दीपक हुडाच्या गोलंदाजीवरही या दोघांनी धावांची लयलूट केली.
डावखुरा पेसर अर्शदीप सिंगने नंतर लुईसला संथ चेंडूवर चकवा दिला. मयांकने उत्तम झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. पॉवर प्लेनंतर राजस्थानचा संघ 1 बाद 57 अशा स्थितीत होता. केएल राहुलने अप्रतिम एकहाती झेल टिपल्यानंतर संजू सॅमसनची निराशा झाली तर डीप मिडविकेटवर फॅबियन ऍलेनचा हवेत झेपावत घेतलेला झेल लिव्हिंगस्टोनची आक्रमक खेळी संपुष्टात आणणारा ठरला. जैस्वालला अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्यानंतर लोमरोरची आक्रमक फटकेबाजी लक्षवेधी ठरली होती.
कार्तिक त्यागीचे शेवटचे षटक आणि पारडे राजस्थानकडे झुकले!
जलद गोलंदाज कार्तिक त्यागी शेवटच्या षटकात गोलंदाजीला आला, त्यावेळी पंजाबला या लढतीत 6 चेंडूत अवघ्या 4 धावांची गरज होती. निकोलस पूरन व मार्करम असे दोन फलंदाज सेट असताना पंजाबचा विजय जणू गृहितच धरला गेला होता. पण, प्रत्यक्षात त्यागीने पूरन व दीपक हुडा यांना तिसऱया व पाचव्या चेंडूंवर बाद केले आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा, असे समीकरण असताना फॅबियन ऍलनला एकही धाव न देता त्याने थरारक विजय संपादन करुन दिला.
4 धावांचे संरक्षण करताना 5 चेंडू निर्धाव!
कार्तिक त्यागीला या षटकात 4 धावांचे संरक्षण करण्याचे कठीण आव्हान समोर होते. पण, त्याने जिद्दीने, अगदी टिच्चून गोलंदाजी करत चक्क 5 चेंडू निर्धाव टाकले, 2 बळी घेतले आणि 2 धावांनी अतिशय निसटता विजय संपादन करुन दिला. या षटकात मार्करमला पहिल्या 2 चेंडूत एकच धाव घेता आली. तिसऱया चेंडूवर पूरनने यष्टीमागे सॅमसनकडे सोपा झेल दिला तर चौथा चेंडू निर्धाव गेला. हुडा पाचव्या चेंडूवर सॅमसनकरवी झेलबाद झाला तर शेवटच्या चेंडूवर 2 धावांची आवश्यकता असताना त्यागीच्या फुल्लर चेंडूवर ऍलेनचा ड्राईव्हचा प्रयत्न फसला आणि राजस्थानच्या रोमांचक विजयावर शिक्कामोर्तब झाले.
धावफलक
राजस्थान रॉयल्स ः इव्हिन लुईस झे. अगरवाल, गो. अर्शदीप 36 (21 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), यशस्वी जैस्वाल झे. अगरवाल, गो. हरप्रीत ब्रार 49 (36 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), संजू सॅमसन झे. राहुल, गो. पोरेल 4 (5 चेंडू), लियाम लिव्हिंगस्टोन झे. ऍलन, गो. अर्शदीप 25 (17 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), महिपाल लोमरोर झे. मार्करम, गो. अर्शदीप 43 (17 चेंडूत 2 चौकार, 4 षटकार), रियान पराग झे. मार्करम, गो. शमी 4 (5 चेंडू), राहुल तेवातिया त्रि. गो. शमी 2 (5 चेंडू), ख्रिस मॉरिस झे. मार्करम, गो. शमी 5 (5 चेंडू), चेतन साकरिया झे. व गो. अर्शदीप 7 (6 चेंडूत 1 चौकार), कार्तिक त्यागी त्रि. गो. अर्शदीप सिंग 1 (3 चेंडू), मुस्तफिजूर रहमान नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 9. एकूण 20 षटकात सर्वबाद 185.
गडी बाद होण्याचा क्रम ः 1-54 (लुईस, 5.3), 2-68 (सॅमसन, 7.1), 3-116 (लिव्हिंगस्टोन, 11.5), 4-136 (जैस्वाल, 14.2), 5-166 (रियान, 16.3), 6-169 (महिपाल, 17.1), 7-175 (तेवातिया, 18.1), 8-178 (ख्रिस मॉरिस, 18.5), 9-185 (साकरिया, 19.5), 10-185 (त्यागी, 19.6).
गोलंदाजी ः मोहम्मद शमी 4-0-21-3, इशान पोरेल 4-0-39-1, दीपक हुडा 2-0-37-0, अर्शदीप सिंग 4-0-32-5, आदिल रशिद 4-0-35-0, हरप्रीत ब्रार 3-0-17-1.
पंजाब किंग्स ः केएल राहुल झे. कार्तिक त्यागी, गो. साकरिया 49 (33 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), मयांक अगरवाल झे. लिव्हिंगस्टोन, गो. तेवातिया 67 (43 चेंडूत 7 चौकार, 2 षटकार), मार्करम नाबाद 26 (20 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), निकोलस पूरन झे. सॅमसन, गो. कार्तिक त्यागी 32 (22 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), दीपक हुडा झे. सॅमसन, गो. त्यागी 0 (2 चेंडू), फॅबियन ऍलन नाबाद 0 (1 चेंडू). अवांतर 9 (नोबॉल 1, वाईड 8). एकूण 20 षटकात 4 बाद 183.
गडी बाद होण्याचा क्रम ः 1-120 (केएल राहुल, 11.5), 2-126 (अगरवाल, 12.6), 1-183 (पूरन, 19.3), 4-183 (हुडा, 19.5).
गोलंदाजी ः मुस्तफिजूर 4-0-30-0, चेतन साकरिया 3-0-31-1, कार्तिक त्यागी 4-0-29-2, ख्रिस मॉरिस 4-0-47-0, राहुल तेवातिया 3-0-23-1, महिपाल लोमरोर 1-0-7-0, रियान पराग 1-0-16-0.