वार्ताहर/ हुक्केरी
गत चार दिवसांपासून हुक्केरी शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गत दहा दिवसांपूर्वी तहसीलदार व मुख्याधिकाऱयांनी शहरात फेरी मारून अतिक्रमण हटवावे अन्यथा आम्ही काढू, अशी नोटीस बजावली होती. मात्र गुरुवारी बाजारपेठेतील कारंजीजवळील दुकान काढताना प्रशासन व व्यापाऱयांमध्ये वादविवाद झाला. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून दुकान काढले होते. यावेळी चिकोडी रस्त्यावरील दुकान मालकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन आम्हाला दुकान काढण्यास वेळ द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.
मात्र, शुक्रवारी सकाळी दुकान काढण्यास कर्मचारी येताच तेथील व्यापाऱयांनी पुन्हा विनंती करून वाद घातला. मात्र, याला झुगारून अतिक्रमण काढताना प्रशासन दिसले. हुक्केरी शहरात व्यापाऱयांनी दिसेल त्या जागी दुकान थाटून व्यापार चालविला होता. पण, प्रशासनाने यावर कारवाईचा बडगा उगारत अतिक्रमण हटाव तीव्र केली आहे. या कामाबाबत काही जणांनी समाधान तर काहींनी संताप व्यक्त केला आहे.