प्रतिनिधी/ संकेश्वर
1 जानेवारीपासून हुक्केरी तालुक्यातील सर्वच ठिकाणच्या प्राथमिक शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेतील सर्व शिक्षकांना स्वॅब देण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार स्वॅबच्या उपलब्ध अहवालात हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी हायस्कूलचे दोघे व कोननकेरी प्राथमिक शाळेतील एक असे एकूण तिघे शिक्षक कोरोनाबाधित झाले आहेत. तिघा शिक्षकांना तालुका आरोग्य केंद्रातून उपचार देण्यात येत असल्याची माहिती गटशिक्षाधिकारी एम. एन. दंडीन यांनी दिली.
बाधित शिक्षकांचा अहवाल येताच घटप्रभा हायस्कूल सलामवाडी व कोननकेरी प्राथमिक कन्नड शाळेला तातडीने सोमवार 11 जानेवारीपर्यंत सुटी देण्यात आली आहे. शिवाय हायस्कूलमधील इतर चार शिक्षक, प्राथमिक शाळेतील 6 शिक्षकांना होमक्वारंटाईन करून त्यांचा स्वॅब घेण्यात आला आहे. त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यास शाळांच्या सुटी कालावधीत वाढ करण्यात येणार असल्याचे दंडीन यांनी सांगितले.
23 जणांची टीम सज्ज
हुक्केरी तालुक्यात एकूण 23 क्लस्टर आहेत. प्रत्येक क्लस्टरमधील शाळेचे व्यवस्थापन कसे चालले आहे? कोरोना विषाणूविषयी कशी दक्षता घेतली जात आहे? प्रत्येक शिक्षकाने स्वॅब दिला का? प्रत्येक शिक्षक शाळेत हजर आहेत का? अध्यापनाचे काम कसे चालले आहे? शाळेच्या वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण केले आहे का? शिक्षक व विद्यार्थी मास्क वापरत आहेत का? यासह विद्यागम धोरणानुसार कामकाज चालू आहे का? या सर्व चौकटीतून शाळेच्या दररोजच्या कामाची तपासणी टीमकडून केली जात आहे. या टीममध्ये 23 सीआरपी, गटशिक्षणाधिकारी, बीआरसी व शिक्षण संयोजक अधिकारी यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांचाही स्वॅब घ्यावा
कोरोनाचा फैलाव घराघरापर्यंत होऊन गेला आहे. अशातच कोरोनाचा दुसरा टप्पा सक्रिय झाल्यामुळे शिक्षकांइतकेच विद्यार्थ्यांचे आरोग्यही महत्त्वाचे आहे. त्यामुळे संपूर्ण शाळा निरोगीमय व सक्षम होण्यासाठी विद्यार्थ्यांचाही स्वॅब घ्यावा व त्या अहवालानुसार निरोगी असल्याची हमी मिळाल्यास अधिक निर्भयता प्राप्त होणार आहे. तालुका प्रशासनाने याचा गंभीर विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.
थर्मल गनचा पुरवठा अद्यापही नाही
शासनाने शाळेच्या व्यवस्थापनेत कोरोनापासून सुरक्षितता मिळविण्यासाठी शाळेत प्रवेश करणाऱया प्रत्येकाची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करावी, अशी सक्ती करण्यात आली आहे. पण शाळा सुरू होऊन नऊ दिवस पूर्ण होत आहेत. अद्यापही तालुका प्रशासनाने प्रत्येक सरकारी शाळांना थर्मल गनच दिले नाहीत. त्यामुळे शरीराची तापमान तपासणी केली जात नसल्याची माहिती पुढे आली आहे. तेव्हा तालुका प्रशासनाने तातडीने थर्मल गनचा पुरवठा शासकिय शाळेत करावा, अशी मागणीही पुढे आली आहे..