ढगफुटीसदृश पावसाचा फटका : एकाचा मृत्यू : किराणा, औषध, धान्य व्यावसायिकांना तडाखा : जनजीवन विस्कळीत : अधिकाऱयांकडून नुकसानीची पाहणी : भरपाई देण्याची मागणी
वार्ताहर / हुक्केरी
रविवारी हुक्केरी शहरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजला. अचानक सुरू झालेल्या या पावसाने जुन्या बसस्थानक परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरुन कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यात शहरातील व्यावसायिकांसह नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. याबरोबरच पावसामुळे गॅरेज कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची दखल घेत प्रांताधिकारी व इतर अधिकाऱयांनी हुक्केरी शहरास भेट देऊन पाहणी केली.
शनिवारी सायंकाळी शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. याचवेळी अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसला होता. यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच रविवारी सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस सुरू झाला. अवघ्या तासाभरातच जुन्या बसस्थानकानजीकच्या नाल्यातून तसेच गजबरवाडी रोडवर पूरस्थिती निर्माण झाली. बघता बघता शहरातील रस्त्यांना ओढय़ाचे स्वरुप प्राप्त झाले होते. यात कार व अनेक दुचाकीदेखील वाहून गेल्याने लाखो रुपयांचा फटका बसला.
सोमवारी सकाळी प्रातांधिकारी अशोक तेली यांच्यासह तहसीलदार अशोक गुराणी, मुख्याधिकारी मोहन जाधव व इतर अधिकाऱयांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. ज्या भागात गटारीची समस्या आहे. त्याची दुरुस्ती करण्यात येईल, ज्या भागात पाईप लहान वापरल्या आहेत त्या हटवून मोठय़ा पाईपचा वापर करून समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊ, असे प्रातांधिकारी तेली यांनी सांगितले. यावेळी नागरिकांनी नगर परिषदेने सांगून देखील लक्ष घातले नसल्याने आम्हाला हा फटका बसला आहे, असे सांगितले. यावेळी प्रातांधिकाऱयांनी ही समस्या निकाली काढून यापुढे असा प्रकार होणार नसल्याचे सांगितले.
30 हून अधिक कुटुंबांना फटका
पावसाचे पाणी 30 हून अधिक घरांमध्ये तब्बल 6 फुटापर्यंत शिरले होते. यात संसारोपयोगी साहित्यासह टीव्ही संच, फ्रिजसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या. तसेच शहरातील भोई गल्ली, बसवनगर, मोसळीकारंजी, मासापीकारंजी, जुन्या बसस्थानक परिसरातील औषध दुकाने, हॉटेल, गोडावून आदी सर्वच व्यावसायिकांचे नुकसान होताना मोठा आर्थिक फटका बसला.
गॅरेज कोसळून एकाचा मृत्यू…
येथील बसस्थानकानजीक एक गॅरेज आहे. सदर गॅरेजमध्ये अस्लम मिरासाब अल्लाखान (वय 52) हे काम करत होते. दरम्यान, अचानक सुरू झालेल्या दमदार पावसामुळे सदर गॅरेज कोसळले. यात अस्लम यांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.