पावसाने उगवण चांगली पण पावसाकडे लागले डोळे – शेतकऱयांना सोमवारपासून ताडपत्रीचे वितरण
प्रतिनिधी/ संकेश्वर
हुक्केरी तालुक्यात 62 हजार हेक्टर जमिनीत पेरण्याची कामे पूर्ण झाली आहेत. तालुक्यात मृग नक्षत्राने यंदा किमया केल्याने जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने पिकांची उगवण चांगली झाली आहे. मात्र पावसाने हजेरी लावल्यास पोषक वातावरण निर्माण होणार आहे. यामुळे बळीराजाचे पावासाकडे डोळे लागले आहेत.
64 हजार हेक्टर पिकाऊ जमिनीपैकी 62.96 हजार हेक्टर जमिनीत पेरण्याची कामे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत. सध्या पिकांची उगवण चांगली होताना अंकुरही फुटल्sढ आहेत. तालुक्यातील भाग हिरव्यागार पैठणीने नटल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सोयाबिन 28,000, शेंगा 5,500, कापूस 3200 व मक्का याची 5400 हजार हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे. याशिवाय कडधान्याचीही पेरणी करण्यात आली आहे. सध्या मक्का बियाण्याचे वितरण सुरू असून याचे 31 जुलैपर्यंत वितरण सुरू राहणार आहे. शेतकऱयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा हुक्केरी तालुक्यासाठी 4371 ताडपत्रींची मागणी केली आहे. त्याप्रमाणे 3400 ताडपत्री उपलब्ध झाल्या आहेत. आणखी 971 ताडपत्री येत्या दोन दिवसात उपलब्ध होणार आहेत. या ताडपत्रीचे सोमवार दि. 5 जुलैपासून संकेश्वर, हुक्केरी व यमकनमर्डी येथील रयत केंद्रातून एकाचवेळी वितरण केले जाणार आहे. ताडपत्री घेण्यासाठी शेतकरी वर्गाने आधारकार्ड आणणे आवश्यक आहे. गत तीन वर्षापुर्वी ज्यांना ताडपत्री मिळाली आहे. त्यांना पुन्हा ताडपत्री देण्यात येणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे.
गेल्या 7 वर्षात पहिल्यादांच जून महिन्यात अपेक्षापेक्षा अधिकचा पाऊस झाल्यान खरीप पिकांना हा पाऊस वरदान ठरला आहे. नदीकाठचा प्रदेश वगळता अन्य कोणत्याही शेतकऱयांना दुबार पेरणीचे संकट आलेले नाही. वेळेवर व यशस्वी पेरणीपूर्ण झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. पिकाची वाढही पोषक असल्याची माहिती कृषी उपसंचालक महादेव पटगुंदी यांनी दिली.
किडीपासून सावधान
हुक्केरी तालुक्यातील निडसोशी विभागात ऊस व सोयाबिन पिकाला प्राधान्य देण्यात आले आहे. यंदा या भागात पाऊसही अधिक पडल्यामुळे जमिनीत अधिकची ओल आहे. याचा परिणाम म्हणून बसवान्न किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱयांनी या किडीपासून संरक्षण मिळविण्यासाठी मिठाची फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.सन जून 2020 मध्ये हुक्केरी तालुक्यात 1517.6 मि.मी पावसाची नोंद झाली होती. तर यंदा जूनमध्ये 2420 मि. मी पावसाची नोंद झाली आहे.