प्रतिनिधी/ संकेश्वर :
चाकरमान्यांच्या परतीने हुक्केरी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 96 वर पोहचली. तथापि या धक्क्याने तालुका दुसऱयांदा हादरला आहे. मात्र गेल्या चार दिवसात नवा एकही रुग्ण आढळून आला नाही व नव्याने कोणास क्वारंटाईन केले नाही. त्यामुळे सध्या कोरोना व्हायरसचे वातावरण क्षमू लागले असून 392 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. परिणामी 40 जणांच्या स्वॅबचा अहवाल अद्यापही उपलब्ध झाला नसल्यामुळे त्या स्वॅबचा अहवाल कसा असणार? ही चिंता दड्डी भागाला लागून राहिली आहे.
दड्डी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्याप्तीत एकूण 239 जणांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यापैकी 34 जणांचा स्वॅब पॉझिटिव्ह तर 195 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले असून 10 जणांचे स्वॅब अहवाल उपलब्ध झालेले नाहीत. तसेच कोट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्याप्तीतील 250 जणांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यापैकी 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर 188 जणांचे स्वॅब अहवाल निगेटीव्ह आले असून 30 जणांचे अहवाल अद्यापही उपलब्ध झाले नाहीत. तसेच कणगले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्याप्तीत करजगा व कणगले येथील 13 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यापैकी 4 जण पॉझिटिव्ह आढळले. तर 9 जणांचा अहवाल निगेटीव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
स्वॅब घेतलेले सर्वचजण मुंबई रिटर्न आहेत. कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट होताच बाधित गावांनी गावचे प्रमुख प्रवेश मार्गच बंद करून संपर्क तोडला आहे. शिवाय गावाबाहेरुन कोणीही यायचे नाही, अशी माहितीच नातेवाईकांना धाडल्याने 28 दिवसाचा कालावधी प्रशासनाच्या धोरणाला समर्थन देण्यासाठी नागरिकांचाही स्वयंस्फूर्तीने सहभाग आहे. त्यामुळे हळूहळू का असेना व्हायरसला गावागावातून पळवून लावण्याचा प्रयत्न आघाडीवरचा असल्याचा दिसत आहे. गत चार दिवसात नव्या रुग्णाची भर पडली नसल्याने प्रशासनासह नागरिकांतूनही समाधान व्यक्त केले जात आहे. येत्या दोन दिवसात 40 जणांचे स्वॅब अहवाल उपलब्ध होताच कोरोनामुक्त गावची घोषणा प्रशासन करेल, अशी चर्चा बाधित गावातून सुरू आहे.