तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव / प्रतिनिधी
17 जानेवारी रोजी होणारा हुतात्मा दिन सीमाभागात गांभीर्याने पाळला जावा, या दिनी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सीमावासीयांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, शिवाय दि. 21 जानेवारी रोजी महानगरपालिकेवर काढण्यात येणाऱया भव्य मोर्चात सीमावासीयांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारी जत्तीमठ येथे पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष म्हात्रु झंगरूचे होते.
17 जानेवारी रोजी कंग्राळी खुर्द येथील हुतात्मा मारूती बेन्नाळकर चौकात सकाळी 8 वाजता हुतात्म्यांना अभिवाद करण्यात येणार आहे. हुतात्म्यांनी केलेल्या त्यागाची आठवण करून देण्यासाठी हुतात्मादिनी सीमावासीयांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे विचार बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. कन्नड कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे महानगरपालिकेसमोर लाल-पिवळा ध्वज लावला आहे. याचाही बैठकीत निषेध करण्यात आला. त्याबरोबरच हा ध्वज तातडीने हटवावा अशी मागणी करण्यात आली. दि. 21 रोजी महानगरपालिकेवर काढण्यात येणाऱया भव्य मोर्चात बहुसंख्येने सीमावासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच समितीतर्फे लवकरच नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार उचगाव येथे करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
सीमालढय़ातील हुतात्म्यांचे योगदान विसरून चालणार नाही, सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. कर्नाटक सरकार अनेक प्रकारे दडपशाही करत आहे. मात्र त्याला न जुमानता सीमाप्रश्नाविषयी मनात धगधग कायम आहे. असे विचार तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे यांनी व्यक्त केले.
हुतात्म्यांच्या त्यागाची आठवण ठेवून सीमाप्रश्नासाठी सर्वांनी आता संघटीत होऊन लढा दिला पाहिजे. तरूणांनी एकत्रित येऊन संघटना मजबूत करावी आणि समितीच्या पाठबळ द्यावे, असे विचार तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष म्हात्रु झंगरूचे यांनी व्यक्त केले.
हुतात्मा दिन अतिशय गांभीर्याने आणि शिस्तबध्दरित्या व्हावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, हुतात्म्यांच्या त्यागाचे मोल हे अविस्मरणीय आहे. हुतात्मादिनी बहुसंख्येने उपस्थित राहून सीमालढय़ाला प्रेरणा द्यावी असे विचार तालुका म. ए. समितीचे उपाध्यक्ष सुरेश डुकरे, यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी तालुका म. ए. समितीचे उपाध्यक्ष पिराजी मुचंडीकर, अशोक पाटील, यल्लाप्पा बेळगावकर आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य सुरज सुतार, लक्ष्मी कुऱहाडे, चेतना अगसगेकर यांचा म्हात्रु झंगरूचे यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी सदानंद पावशे, परशराम पाटील, शट्टुप्पा चव्हाण, धनाजी कांबळे, राजेंद्र पाटील, यशवंत गुरव, अजित कुराडे, विजय सावंत, सुरज सुतार, पुंडलिक मोरे, रमेश घुमटे, बाळू इंगळे, सुरेश अगसगेकर, एन. वाय. चौगुले, एल. बी. खांडेकर, एन. डी. देसुरकर, नामदेव सांबरेकर, विठृल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.