शहर म. ए. समितीचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी झालेल्या आंदोलनामध्ये अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती. या हुतात्म्यांना सोमवार दि. 17 रोजी अभिवादन करण्यात येणार आहे. सीमाबांधवांनी सोमवारी गांभीर्याने हा दिवस आचरणात आणावा. सकाळी 9 वाजता गर्दी न करता हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शहर म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. मागील 65 वर्षांपासून रस्त्यावरच्या लढाईसोबत न्यायालयीन लढाई सुरू आहे. सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्यानंतरच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली मिळणार आहे. त्यामुळे सीमावासियांनी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एका झेंडय़ाखाली येण्याचे आवाहन शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी केले.
संपूर्ण देशावरच कोरोनाचे संकट असल्यामुळे कार्यकर्त्यांनी गर्दी न करता थोडय़ा थोडय़ा संख्येने दिवसभरात हुतात्म्यांना अभिवादन करावे. कोरोना नियमावलीचे पालन करून अभिवादन करावे, असे आवाहन माजी नगरसेवक नेताजी जाधव, मनोहर हलगेकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, दक्षिण विभाग महिला आघाडी प्रमुख सुधा भातकांडे, सेपेटरी वर्षा आजरेकर, गीता हलगेकर यांनी केले आहे.