पुलवामा हल्ल्यात मेजर विभूतींना प्राप्त झाले होते हौतात्म्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2019 मध्ये जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेले मेजर विभूति शंकर ढौंडियाला यांची पत्नी निकिता कौलने शनिवारी भारतीय सैन्यात प्रवेश मिळविला आहे. निकिता या भारतीय सैन्यात लेफ्टनंट झाल्या आहेत. त्यांनी सैन्याचा गणवेश परिधान करून मेजर विभूति शंकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विभूति यांच्या मार्गावर चालणे आणि त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करणे माझे काम असल्याचे त्यांनी म्हटले होते. शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) परीक्षा आणि सेवा चयन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यावर मागील वर्षापासून त्या चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीत प्रशिक्षण घेत होत्या.
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. दहशतवादी हल्ल्यानंतर पुलवामाच्या पिंगलान गावात दहशतवाद्यांच्या विरोधात सैन्याने मोहीम राबविली होती. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांची गोळी लागल्याने चार सैनिक हुतात्मा झाले होते. यात मेजर स्तरीय अधिकारी विभूति यांचाही समावेश होता.