राहुल सुळगेकर नगरीमध्ये कार्यक्रम,
उचगावचे सुपुत्र हुतात्मा राहुल भैरू सुळगेकर यांच्या पुतळय़ाचा अनावरण समारंभ उचगाव येथील राहुल सुळगेकर नगरीमध्ये बुधवार दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर पुतळा बेळगाव कॅम्पमधील गांधीजींच्या पुतळय़ापासून वाजत गाजत सन्मानाने उचगावला मंगळवारी सायंकाळी आणण्यात आला.
मंगळवारी दुपारी या मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामीण बीजेपी अध्यक्ष धनंजय जाधव, श्रीराम सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष रवि कोकितकर, ग्रा. पं. उचगावचे अध्यक्ष जावीद जमादार, उपाध्यक्षा मथुरा तेरसे, हुतात्मा राहुलचे वडील भैरू सुळगेकर तसेच उचगाव ग्रा. पं. चे सदस्य, आजी-माजी अध्यक्ष-उपाध्यक्ष व युवक मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सदर मिरवणूक बेळगाव-वेंगुर्ले मार्गे उचगावात दाखल झाल्यानंतर गावामध्ये प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात येऊन उद्घाटनस्थळी जाऊन मिरवणुकीचा समारोप झाला.
उद्घाटन समारंभ
बुधवारी सकाळी 11 वाजता राहुल सुळगेकर नगरीमध्ये या पुतळय़ाचा अनावरण समारंभ होणार आहे. यावेळी ब्रिगेडीयर रोहित चौधरी, कर्नल स्वप्निल कुमार, निवृत्त कर्नल पी. व्ही. रामनाथकर, लेफ्टनंट कर्नल पंकज गुप्ता, लेफ्टनंट कर्नल मनोज शेट्टी, सुभेदार मेजर सलीम एस., जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, वरि÷ पोलीस अधिकारी लक्ष्मण निंबरगी, ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, उत्तरचे आमदार अनिल बेनके, सीपीआय राघवेंद्र हल्लूर, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष जावीद जमादार, उपाध्यक्षा मथुरा तेरसे, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, रमाकांत कोंडुस्कर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे भैरू सुळगेकर यांनी कळविले आहे.