गलवान खोऱयात आले होते हौतात्म्य
हैदराबाद
सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीत हुतात्मा झालेले कर्नल संतोष बाबू यांची पत्नी संतोषी यांना तेलंगणा सरकारने उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्त केले आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी संतोषी यांना बुधवारी शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र सोपविले आहे. हुतात्म्याच्या पत्नीला हैदराबाद किंवा नजीकच्या परिसरातच नियुक्त करण्याचा निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना दिला आहे. कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी संतोषी या 8 वर्षीय कन्या आणि 3 वर्षीय मुलासह सद्यकाळात दिल्लीत वास्तव्यास आहेत. तर हुतात्मा कर्नल संतोष बाबू यांच्या आई हैदराबादमध्ये राहतात. तेलंगणा सरकारने हुतात्मा संतोष बाबू यांच्या कुटुंबाला 5 कोटी रुपयांचा मदतनिधी देण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. गलवान खोऱयात चीनच्या घुसखोरीवरून मागील महिन्यात हिंसक झटापट झाली होती. या संघर्षात कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले हेते. तर चीनचे किमान 43 सैनिक या संघर्षात मारले गेले होते. सीमेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान कर्नल संतोष बाबू हे चर्चा करण्यासाठी गेले होते. परंतु चिनी सैनिकांनी विश्वासघात करत त्यांच्यावर हल्ला केला होता.