प्रतिनिधी/ सातारा
शहरातील जिल्हा क्रीडा संकुलासमोरील हुतात्मा स्मारकाच्या पुढय़ातच शहरातील एका मटकाकिंगने ओपन-क्लोजचा बाजार चालवला असून दिवसाढवळ्या सुरु असलेल्या या अवैध बाजारावर शाहूपुरी पोलिसांचे अजून लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हुतात्मा स्मारकासारख्या पवित्र जागेवर सुरु असलेल्या या मटक्याच्या टपऱयांवर शाहूपुरी पोलीस कारवाई करणार काय? असा सवाल या परिसरातील स्थानिकांनी केला आहे.
याबाबत नागरिकांनी दिलेली माहिती अशी, जिल्हा क्रीडा संकुलासमोरील पूर्वीच्या जमीनदोस्त केलेल्या भू-विकास बँकेच्या जागेवर सध्या पुनर्विकासाचे काम सुरु आहे. त्यामुळे त्या परिसरातील अनेक टपऱया हटविण्यात आल्या आहेत. परंतू काही बहाद्दरांनी मटक्याचा गोरखधंदा पुन्हा सुरु करण्यासाठी या हटविलेल्या टपऱया पुन्हा हुतात्मा स्मारकासमोर म्हणजेच भू-विकास बँकेच्या निर्माणाधीन साईटसमोर आणून टाकलेल्या आहेत.
याचठिकाणी भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत मटक्यांचे ओपन-क्लोज आकडे घेतले जात आहेत. यासंदर्भात अनेक सुजाण नागरिकांनी यापूर्वीच शाहूपुरी पोलिसांना माहिती कळवलेली असूनसुद्धा शाहूपुरी पोलीस या प्रकाराकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत. सध्या पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने जिह्यातील मटकाबुकींवर कारवाईचा धडाका लावलेला आहे. असे असताना सातारा शहराचे नाक असलेल्या व हुतात्म्यांच्या तसेच स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाच्या पुढय़ातच पोलिसांच्या आशिर्वादाने राजरोसपणे मटक्याचे आकडे ओपन-क्लोज केले जात आहेत, हे नक्कीच सातारा पोलिसांसाठी भूषणावह नाही.
त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी याप्रकरणी लक्ष घालून हुतात्मा स्मारक चौकात मटकाबुकींनी भरवलेला ओपन-क्लोजचा बाजार त्वरित उठवावा, अशी मागणी करंजे पेठ व परिसरात राहणाऱया स्थानिक नागरिकांनी केली आहे.