प्रतिनिधी / शिरोळ
नांदणी (ता शिरोळ) येथील म्हैसी चोरी प्रकरणी पाच संशयितांना अटक करून त्यांच्याकडून 3 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल शिरोळ पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर संशयित आरोपीना जयसिंगपुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १ सप्टेंबर अखेर पोलीस कोठडीी दिली असून संशयिताकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, नांदणी येथील फिर्यादी शरद बापू माळी यांचा गैबी दर्ग्याच्या मागील बाजूस जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यातून संशयित आरोपी दीपक अरुण शेंडे (वय 26 ), तुषार शामराव कांबळे (वय 20), शितल राजेंद्र कांबळे (वय 27), योगेश किरण कांबळे (वय 24 ) अक्षय सुनील चाणक्य (वय 26 ) व प्रतीक बाबासो गाठ (वय 17 ) सर्व रा. हुपरी ता. हातकणंगले यांनी पाच म्हैसी चोरी केल्याचा पोलिसांनी आरोप ठेवला आहे.
यामधील सहा पैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी शरद माळी यांच्या जनावरांच्या गोठ्यातून मुरा जातीची 3 म्हैशी, कर्नाळी जातीची एक म्हैस, मुरा जातीचे दोन रेडकू, हे छोटा हत्ती टेम्पोमधून 28 तारखेला चोरून नेत होते. हेरवाड येथे संशयित आरोपी थांबले होते. कुरुंदवाड पोलिसांनी रात्रीची गस्त घालत असताना संशयाने त्या सर्वांना चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये चोरीचा प्रकार उघडकीस आला, संशयित चोरट्याने चोरीची कबुली दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार बी एस माने हे करीत आहेत.