8 जण ठार ः 26 जखमी ः कोल्हापूरहून निघालेल्या खासगी बसची ट्रकला धडक
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोल्हापूरहून बेंगळूरला निघालेली खासगी बस आणि बेंगळूरहून पुण्याला जाणारा ट्रक यांच्यात सामोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले आहेत. तर 26 जण जखमी झाले. हुबळी-धारवाड बायपासवरील रेवडीहाळजवळ सोमवारी मध्यरात्री 12ः30 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. जखमींवर हुबळीच्या किम्स इस्पितळात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी धारवाडनजीक अपघातात 9 जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी मध्यरात्री अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सोमवारी रात्री नॅशनल टॅक्हल्सची बस (केए 51 एए 7146) बेंगळूरला निघाली होती. मध्यरात्री 12ः30 च्या सुमारास हुबळी-धारवाड बायपासवर बेंगळूरहून पुण्याकडे तांदळाची वाहतूक करणाऱया ट्रकला (एमएच 16 एवाय 6916) या बसची धडक बसली. घटनास्थळी 6 जण जागीच ठार झाले तर दोघांचा किम्स इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातात इचलकरंजी येथील बाबासो चौगुले (वय 59), नॅशनल टॅव्हल्सचा बसचालक अतावुल्ला खान (वय 40 रा. बेंगळूर), तुमकूरमधील नागराजू बी., चिकोडी येथील प्रवासी बाबूसाब (वय 55), म्हैसूरमधील मोहम्मद दयाल बेग, अहमदनगरमधील अक्षय दावर (वय 28), उत्तरप्रदेशमधील हकिफ (वय 40), अश्पाक, मुस्कान अशी मृतांची नावे आहेत.
जखमींमध्ये मूळचा नेपाळमधील के. साई (वय 55), रवी सिंग (वय 25), टिकू (वय 15), कोल्हापूरमधील ओमकार मालाई (वय 28), सिमरन पवार (वय 28), शुभम चौगुले (वय 29), ओमकार सुतार (वय 28), चंद्रकांत आर्डे (वय 30), सुप्रिया पाटील (वय 27), सरोज वाघ (वय 52), सतीश पांडूरंग वाघ (वय 54), दिग्विजय पाटील (वय 34), अक्षय कोरे (वय 24), अनिता राऊत (वय 34), संजयसिंग शिंदे (वय 42), इचलकरंजी येथील अक्षय म्<ाालपानी (वय 26), प्रतीक्षा नवाळे (वय 25), मुळचे नेपाळमधील चेन्याले रवीसिंग (वय 24), महेंद्र रवी सिंग, रत्नागिरीतील संजय पिसे (वय 52), तामिळनाडूतील राजा फ्रान्सिस (वय 38), निपाणी येथील कृष्ण महाजन (वय 36), संकेश्वरमधील सहना गुडसी (वय 23), तुमकूर जिल्हय़ातील शिरा येथील अनिता (वय 39), सांगलीतील तानाजी सपकाळ (वय 46), सुलोचना (वय 45), अहमदनगरमधील (मिरज) दिगंबर चोळ (वय 27) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर हुबळीतील किम्समध्ये उपचार सुरू आहेत. हुबळी उत्तर रहदारी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात
समोरून जात असलेल्या ट्रक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसची ट्रकला धडक बसल्याचे सांगण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप उलगडलेले नाही. याविषयी पोलिसांकडून तपास सुरू आहे. जखमींनी आपण कोल्हापूरहून बेंगळूरला निघालो होतो. गाढ झोपेत असल्याने अपघात कसा झाला, याविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. अपघाताची माहिती मिळताच हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त लभूराम यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर हुबळीच्या किम्स इस्पितळात जाऊन जखमींची विचारपूस केली.
अपघातग्रस्त ट्रकमधून तांदळाची वाहतूक होत होती. अपघातामुळे दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर तांदळाची पोती रस्त्यावर विखुरली होती. त्यामुळे महामार्गावर वाहतूक खोळंबली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने आणि तांदळाची पोती बाजूला हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.
अपघातांची मालिका सुरूच
चार दिवसांपूर्वीच धारवाडनजीक साखरपुडा आटोपून परतत असलेल्या प्रुझरची झाडाला धडक बसून 9 जण ठार तर 10 जण जखमी झाले होते. बाड क्रॉसनजीक घडलेली ही घटना ताजी असतानाच हुबळी-धारवाड बायपासवर सोमवारी मध्यरात्री अपघाताची घटना घडली आहे. ट्रकमधील चालक, क्लिनर व अन्य एकाचा मृत्यू झाला आहे.