तब्बल 1 हजार 505 मीटर लांब प्लॅटफॉर्म
प्रतिनिधी/ बेळगाव
जगातील सर्वात लांबीचा प्लॅटफॉर्म हुबळी येथे तयार होत आहे. हुबळी येथील सिद्धारूढ स्वामी रेल्वेस्थानकावर हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. याचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. एकूण 1 हजार 505 मीटर लांबीचा जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.
नैर्त्रुत्य रेल्वेच्या माध्यमातून हुबळी रेलेस्थानकाचे नुतनीकरण करण्यात येत आहे. यामध्ये प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येत आहे. यापूर्वी गोरखपूर रेल्वेस्थानकात 1 हजार 366 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म होता. हुबळी येथील प्लॅटफॉर्म त्याहून मोठा असल्याने तो जगातील सर्वात लांबीचा प्लॅटफॉर्म ठरणार आहे. यापूर्वी हुबळी येथे 5 प्लॅटफॉर्म होते. आता ती संख्या 8 पर्यंत पोहोचणार आहे.
एकाच प्लॅटफॉर्मवर दोन रेल्वे थांबण्याची सोय
यापूर्वी प्लॅटफॉर्मची लांबी 550 मीटर होती. ती आता 1 हजार 505 मीटर करण्यात आली आहे. यामुळे एकाचवेळी दोन रेल्वे थांबू शकतात. प्लॅटफॉर्म क्र. 1 व 8 ची लांबी वाढविण्यात आली आहे. आता या रेल्वेस्थानकाला 3 प्रवेशद्वारे असणार आहेत. तीन प्रवेशद्वारे असणारी देशात मोजकीच रेल्वेस्थानके आहेत. हुबळी येथे जंक्शन असून नैर्त्रुत्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मंजूर करण्यात आलेल्या 90 कोटी रुपयांच्या निधीतून ही विकासकामे करण्यात येत आहेत.