वार्ताहर / हुबळी
भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि लॉजिस्टीक अलॉय्ड सर्व्हिसेस कंपनी लि. च्या संयुक्त विद्यमाने हुबळी येथील विमानतळावर लवकरच देशी मालवाहू टर्मिनल सुरू होणार आहे. त्यामुळे हुबळी विमानतळ उत्तर कर्नाटकातील पहिले मालवाहू टर्मिनल ठरणार आहे. फेब्रुवारीपासून ते सुरू होण्याची शक्यता आहे.
हुबळीत नवे प्रवासी टर्मिनल निर्माण झाल्यानंतर जुन्या टर्मिनलच वापर बंद झाला. आता त्याच टर्मिनलमध्ये 60.6 कोटी रुपये खर्च करून मालवाहू टर्मिनलमध्ये रुपांतर केले आहे. पेब्रुवारी 2021 मध्ये ते सुरू करण्याचा निर्णय
घेतला आहे.
हुबळी विमानतळावर आगामी काळात वाहतूक होणारा माल सुरक्षित ठेवण्याची व्यवस्थाही केली आहे. किमती वस्तू व अपायकारक वस्तुंसाठी स्वतंत्र खोल्या निर्माण केल्या आहेत. शितगृहही निर्माण केले आहे. सुमारे 700 चौ. मीटर परिसरातील या टर्मिनलमध्ये वर्षाला 15 हजार मेट्रिक टन मालाचा साठा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे आगामी काळात हे टर्मिनल मालवाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
येथे प्रवासी विमानसेवा पुरविणाऱया एअरलाईन्स, इंडिगो व स्टार एअरलाईन्सने देखील कार्गो विमानसेवा पुरविण्याची तयारी केली आहे.
चेन्नई, बेंगळूर, मुंबईमध्ये हुबळीतून विमानाद्वारे मालवाहतूक होणार आहे. एअर इंडिया, अलायन्स एअर देखील यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हुबळी विमानतळाचे संचालक एस. प्रमोदकुमार ठाकरे यांनी
दिली आहे.