वीरेंद्र शरनी, वैभव संघमित्र, ऋषिल दोरकाडी यांची दमदार शतके
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना व धारवाड विभागीय क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने केएससीए धारवाड झोन फर्स्ट डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या रंगतदार सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब ब व युनियन जिमखाना बेळगाव या दोन्ही संघांची धावसंख्या समान झाल्याने सामना टाय झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 2 गुण देण्यात आले. वीरेंद्र शरनी, वैभव संघमित्र व ऋषिल दोरकाडी या तिघा खेळाडूंनी शतक झळकविले. ऑटोनगर येथील केएससीए क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब ब संघाने 50 षटकात 8 बाद 346 धावांचा डोंगर उभा केला. त्यात वीरेंद्र शरनीने 7 षटकार, 13 चौकारासह 88 चेंडूत 141 धावा फटकावत स्पर्धेतील पाचवे शतक नोंदवले. निखील दोडमनीने 2 षटकार, 7 चौकारासह 68, स्टीव्हन गुड्डारेड्डीने 42, श्रेयश जी.ने 19, धुव नाईकने 13, साई कुहरने 11 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे ऋषिकेश राजपूतने 73 धावात 4, पुरुषोत्तम जे.ने 66 धावात 2 तर वैष्णव संघमित्रने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल युनियन जिमखाना संघाने 50 षटकात सर्व बाद 346 धावाच करून सामना टाय केला. सलामीच्या ऋषिल दोरकडीने 1 षटकार, 12 चौकारासह 142 धावा करून स्पर्धेतील सहावे शतक तर वैष्णव संघमित्रने 3 षटकार, 15 चौकारासह 116 चेंडूत 132 धावा करीत स्पर्धेतील 7 वे शतक झळकाविले. ऋषिल दोरकाडी व वैष्णव संघमित्र या दोघांनी दुसऱया गडय़ासाठी 162 धावांची भागीदारी केली पण नंतरच्या फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी न केल्याने सामना टाय झाला. त्यात ओम रूपचंदानीने 15, ऋषिकेश राजपूतने 13 धावा केल्या. हुबळी स्पोर्ट्सतर्फे वीरेंद्र शरनीने 30 धावात 5, सौरभने 60 धावात 3 तर सात्विक घोरपडेने 1 गडी बाद केला. सामना टाय झाल्याने दोन्ही संघांना समान 2 गुण देण्यात आले.