समाजमाध्यमांवर प्रसारित : मिशेल ओबामांनी घेतली दखल
अमेरिकेत ओबामा दांपत्याप्रमाणे नटून मुलामुलीने केलेले फोटोशूट समाजमाध्यमांवर चर्चेत आहे. बराक आणि मिशेल ओबामा यांनी 20 जानेवारी रोजी नव्या अध्यक्षांच्या शपथग्रहण सोहळय़ात केलेल्या पेहरावाची नक्कल करत या चिमुकल्यांनी स्वतःची छायाचित्रे काढून घेतली आहेत.
मिशेल ओबामा यांनी स्वतःच्या समाजमाध्यम खात्यावरून ही छायाचित्रे प्रसारित केल्यावर आतापर्यंत त्यांना 50 लाखांहून अधिक प्रेक्षक लाभले आहेत. अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनामध्ये राहणारे रेलीह आणि जायडेन यांनी यापूर्वी कमला हॅरिस आणि प्रिन्स चार्ल्स यांच्यासारखेही फोटोशूट करविले आहे. पण त्यावेळी त्यांच्या या कृतीची अधिक चर्चा झाली नव्हती.
रेलीहची नातलग जोई हॅम्पटन यांनी दोघांचे छायाचित्रण केले आहे. मिशेल ओबामांना शपथग्रहण सोहळय़ात पाहिल्यावर अशाप्रकारच्या छायाचित्रणाची कल्पना सुचली आहे. रेलीहने मिशेल यांच्या मोनोक्रोम लुकची नक्कल केली, तर जायडेनने युनायटेड स्टेट पिनसह नेव्ही कोट, पांढरा शर्ट आणि निळा टाय परिधान केल्याची माहिती रेलीहची आजी शेला हॅम्पटन यांनी दिली आहे.
मिशेल यांच्यासारखा बेल्ट खरेदी करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागली आहे. चालायला शिकल्यापासून रेलीह मॉडेलिंग करत आहे. दर रविवारी चर्चमधून आल्यावर ती स्वतःचा फोटोशूट करविते. छायाचित्रे काढताना आणि भावमुद्रेवेळी नैसर्गिक स्वरुप असावा याची ती काळजी घेते.