वृत्तसंस्था/ सिडनी
येथे सुरू असलेल्या एटीपी चषक पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या युगो हुम्बर्टने रशियाच्या द्वितीय मानांकित डॅनिल मेदव्हेदेवला पराभवाचा धक्का दिला.
रविवारी येथे झालेल्या या स्पर्धेतील ब गटातील सामन्यात फ्रान्सच्या हुम्बर्टने मेदव्हेदेवचा 6-7 (5-7), 7-5, 7-6 (7-2) असा पराभव केला. 2022 च्या टेनिस हंगामाच्या प्रारंभी मेदव्हेदेवला पराभव पत्करावा लागला आहे. हा सामना तीन तास चालला होता. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात रोमन सेफुलीनने आर्थर रिंडेरकिनेचचा 2-6, 7-5, 6-3 असा पराभव केला. मेदव्हेदेवने गेल्यावर्षी अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या जॉन इस्नेरने स्केनुरचा 6-1, 6-3 असा पराभव केला. क गटातील एका सामन्यात टेलर फ्रिझने ऍलीसिमेचा 6-7 (6-8), 6-4, 6-4 असा पराभव केला. या सांघिक स्पर्धेत अमेरिकेने क गटात 2-0 अशी आघाडी मिळविली आहे तर यजमान ऑस्ट्रेलियाचा ब गटातील सामना इटलीशी होणार आहे. जर्मनी व ब्रिटन यांच्यात क गटातील लढत होईल.