रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसीचा समावेश
वृत्तसंस्था/ मुंबई
हुरुन ग्लोबलने जगातील 500 मौल्यवान कंपन्यांची यादी नुकतीच जाहीर केली असून यामध्ये भारतातील 12 कंपन्यांचा समावेश झाला आहे. यात रिलायन्स, टीसीएस व एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे.
हुरून रिसर्च इन्स्टिटय़ूट यांनी हुरून ग्लोबल 500 मौल्यवान कंपन्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली. या यादीत बाजारात लिस्टेड नसलेल्या कंपन्याही समाविष्ट झाल्याचे समजते. जगातील अव्वल मौल्यवान कंपनी म्हणून यादीत अग्रस्थानावर ऍपल कंपनी राहिली आहे. ऍपलनंतर पाठोपाठ मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि अल्फाबेट यांचा क्रमवारीत नंबर लागतो. या चारही कंपन्यांचे एकूण मूल्य 297.61 लाख कोटींनी वाढून 595.22 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. या चारही कंपन्यांचा वाटा 14 टक्के इतका राहिला आहे.
अमेरिकेन कंपन्या सर्वाधिक
हुरून ग्लोबलने जी 500 कंपन्यांची यादी जाहीर केली आहे त्यात भारतीय 12 कंपन्या असल्या तरी अमेरिका मात्र यात आघाडीवर आहे. कारण त्यांच्या कंपन्यांची संख्या सर्वाधिक यादीत समाविष्ट झालेली आहेत. या यादीत अमेरिकेतील 243, चीनमधील 47 आणि जपानमधील 30 कंपन्या समाविष्ट आहेत.