सरकारकडून मोठी कारवाई होणार
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हुर्रियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटांच्या विरोधात केंद सरकार मोठी कारवाई करू शकते. दोन्ही गटांच्या विरोधात अवैध कारवाया प्रतिबंधक अधिनियम (युएपीए) अंतर्गत बंदी घातली जाऊ शकते. जम्मू-काश्मीरमध्ये दोन दशकांपासून फुटिरवादाचे नेतृत्व करणाऱया फुटिरवादी संघटना हुर्रियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटांवर युएपीएच्या अंतर्गत बंदी घातली जाण्याची अपेक्षा असल्याचे अधिकाऱयांनी म्हटले आहे.
पाकिस्तानात इन्स्टिटय़ूट्सकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना एमबीबीएस जागा देण्याशी संबंधित अलिकडेच झालेल्या तपासातून धक्कादायक खुलासे झाले होते. काही संघटनांकडून उमेदवारांनी दिलेल्या रकमेचा वापर केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमये दहशतवादी संघटनांना आर्थिक बळ पुरविण्यासाठी केल्याचे समोर आले होते.
हुर्रियतच्या दोन्ही गटांवर युएपीएच्या कलम 3 (1) अंतर्गत बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. या कलमाच्या अंतर्गत एखादी संघटना अवैध असल्याचे केंद्र सरकारचे मत झाल्यास अधिसूचना जारी करून अशा संघटनेवर बंदी घालण्याचे पाऊल उचलले जाते.
दोन्ही गटांवर बंदी घालण्याचा हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या दहशतवादविरोधी झिरो टॉलरन्सच्या धोरणाच्या अंतर्गत मांडण्यात आला आहे. हुर्रियत कॉन्फरन्स 1993 साली 26 समुहांसह अस्तित्वात आला होता. यातील काही पाकिस्तानी आणि प्रतिबंधित संघटना म्हणजेच जमात-ए-इस्लामी, जेकेएलएफ आणि दुख्तारन-ए-मिल्लतचे समर्थक सामील होते. तसेच पीपल्स कॉन्फरन्स आणि मीरवाइज उमर फारुखच्या अध्यक्षतेखालील अवामी ऍक्शन कमिटीही यात सामील होती.
2005 मध्ये फूट
या फुटिरवादी समुहात 2005 मध्ये फूट पडली होती. यातील एका गटाचे नेतृत्व मीरवाइज करत होता. तर दुसऱया कट्टरवादी गटाचे नेतृत्व सैयद अशील शाह गिलानीने केले होते. केंद्र सरकारने आतापर्यंत जमात-ए-इस्लामी आणि जेकेएलएफला युएपीए अंतर्गत बंदी घातली आहे. दोघांवरही 2019 मध्ये बंदी घालण्यात आली होती. दहशतवादी गटांच्या वित्तपुरवठय़ात फुटिरवादी नेत्यांच्या सहभागाचे संकेत तपासात मिळाले आहेत. यात हुर्रियत कॉन्फरन्सचे सदस्य आणि कॅडर सामील आहे. पॅडर्सनी जम्मू-काश्मीरमध्ये फुटिरवादी आणि दहशतवदी कारवायांकरता आर्थिक मदत करण्यासाठी हवालासह विविध अवैध माध्यमांमधून देश आणि विदेशातून पैसे जमविले होते असे अधिकाऱयांनी म्हटले आहे.
देशाविरोधात वापरला पैसा
जमविण्यात आलेल्या रकमेचा वापर काश्मीर खोऱयात सुरक्षा दलांवर दगडफेक, शाळा पेटवून देणे, सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचविणे आणि भारताविरोधात युद्ध पुकारण्यासाठी एका गुन्हेगारी कटाच्या अंतर्गत करण्यात आला आहे. एनआयएने तपास करत काही प्रकरणांमध्ये हुर्रियतच्या अनेक सदस्यांना अटक केली आहे. दोन्ही गटांचे काही सदस्य 2017 पासून तुरुंगात कैद आहेत. कैदेत असलेल्या हुर्रियतच्या सदस्यांमध्ये गिलानीचा जावई अल्ताफ अहमद शाह देखील सामील आहे.