मागील दरवाजा फोडून 9 लाख 50 हजाराचा ऐवज पळविला, नागरिक चिंताग्रस्त
प्रतिनिधी /बेळगाव
हुलबत्ते कॉलनी येथे केवळ आठवडाभरात दुसऱयांदा घरफोडीची घटना घडली आहे. एका बंद घराचा पाठीमागचा दरवाजा फोडून चोरटय़ांनी 9 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
हुलबत्ते कॉलनी येथील अनुग्रह निवास हे घर फोडण्यात आले आहे. गुरुवार दि. 17 फेब्रुवारीच्या सायंकाळी 5 पासून शनिवार दि. 19 फेब्रुवारीच्या सायंकाळी 5 या वेळेत चोरीची ही घटना घडली आहे. रविवारी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली असून पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.
चिंतामणी वामन ग्रामोपाध्ये यांनी फिर्याद दिली आहे. हे कुटुंबीय गुरुवारी सायंकाळी आपल्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बेंगळूरला गेले होते. शनिवारी सायंकाळी गावाहून परतले, त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. पाठीमागचा दरवाजा फोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केल्याचे दिसून आले.
कपाटातील 80 ग्रॅम सोने, चांदी, अडीच लाख रुपये रोख रक्कम चोरटय़ांनी पळविली आहे. हा प्रकार उघडकीस येताच चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
गेल्या रविवारी 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत सुनील मधुकर विजापुरे यांच्या हुलबत्ते कॉलनी येथील घरात चोरी झाली होती. चोरटय़ांनी 6 लाख 83 हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला होता. केवळ आठवडाभरात हुलबत्ते कॉलनी परिसरात चोरीची दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.