मुंबई / वृत्तसंस्था
इंग्लिशमन इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आज (दि. 24) आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध मैदानात उतरेल, त्यावेळी हॅट्ट्रिक पराभवातून सावरण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. केकेआरकडे इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा मॉर्गनसारखा अव्वल कर्णधार असला तरी या मोसमात अद्याप सांघिक कामगिरीच्या निकषावर ते अपयशी ठरत आले आहेत. शुक्रवारच्या लढतीपूर्वी हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी होता.
राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या सर्वात खराब फॉर्ममध्ये असून याचा केकेआर लाभ घेण्याचा आज प्रयत्न करेल. चेन्नईविरुद्ध 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला, त्यावेळी पॅट कमिन्सची धडाकेबाज फलंदाजी लक्षवेधी ठरली होती. पण, केकेआरचे आघाडीचे फलंदाज अगदी किरकोळ आव्हानासमोर देखील बहुतांशी अपयशी ठरत आले आहेत, हेच आतापर्यंत दिसून आले आहे. निर्णायक षटकात त्यांचे सीमर्स देखील महागडे ठरत आले आहेत. इतके पुरेसे नसेल म्हणून की काय, शुभमन गिल व मॉर्गन हे त्यांचे अव्वल फलंदाज पॉवर प्ले पूर्ण होण्यापूर्वीच बाद होत आले आहेत.
आंद्रे रसेल बहरात परतला, ही मात्र केकेआरसाठी जमेची बाजू ठरत आली आहे. त्याने 22 चेंडूतच 54 धावांची आतषबाजी केली होती. हा फॉर्म पाहता रसेलला बढतीवर फलंदाजीला पाठवण्याचा पर्याय विचारात घेता येऊ शकेल. कर्णधार मॉर्गनला स्वतःच्या आणि शुभमनच्या फॉर्मची देखील चिंता आहे.
राजस्थानही खराब फॉर्ममध्ये
दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा संघ आरसीबीविरुद्ध 10 गडी राखून नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर येथे केकेआरविरुद्ध मैदानात उतरत आहे. राजस्थानला या मोसमात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केवळ दुसऱया सामन्यात विजय संपादन करता आला आहे. संजू सॅमसनने पंजाब किंग्सविरुद्ध 119 धावांची आतषबाजी केली. पण, त्यावेळी देखील संघ विजयापासून दूर राहिला. जोस बटलर, मनन वोहरा व डेव्हिड मिलर यांच्या खराब फॉर्मचा या संघाला फटका बसत आला आहे.
आयपीएलच्या उद्घाटनाच्या आवृत्तीत जेतेपद संपादन करणाऱया राजस्थानला गोलंदाजीत देखील बरीच चिंता जाणवत राहिली असून ख्रिस मॉरिस व मुस्तफिजूर रहमान अद्याप धावा रोखण्यात यशस्वी ठरलेले नाहीत. जोफ्रा आर्चर व बेन स्टोक्स दुखापतीमुळे यापूर्वीच बाहेर फेकले गेले असल्याने त्यांच्याकडे विदेशी खेळाडूत फारसे पर्यायही बाकी नाहीत. या संघातील लियाम लिव्हिंगस्टोन बायो-बबलला कंटाळल्याचे कारण देत यापूर्वीच मायदेशी रवाना झाला आहे.
प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार व यष्टीरक्षक), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, मयांक मार्कंडे, ऍन्डय़्रू टाय, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान, चेतन साकारिया, केसी करिअप्पा, कुलदीप यादव, आकाश सिंग.
कोलकाता नाईट रायडर्स ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नितीश राणा, टीम सेफर्ट, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वॉरियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शकीब अल हसन, शेल्डॉन जॅक्सन, वैभव अरोरा, हरभजन सिंग, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर, पवन नेगी.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.