सानिया-हर्डेक्स यांचे दुहेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त
वृत्तसंस्था/ दुबई
येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए टूरवरील दुबई खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत लॅटव्हियाच्या जेलेना ओस्टापेंकोने रूमानियाच्या माजी टॉप सीडेड सिमोना हॅलेपचा उपांत्य फेरीत पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि त्याची साथीदार झेकची लुसी हर्डेक्स यांचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले.
गुरूवारी खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात ओस्टापेंकोने हॅलेपचा 2-6, 7-6 (7-5), 6-0 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. रूमानियाच्या हॅलेपने यापूर्वी दोनवेळा ही स्पर्धा जिंकली होती. आता ओस्टापेंको आणि व्हेरोनिका कुड्रेमेटोव्हा यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. दुसऱया उपांत्य लढतीत दुखापतीमुळे मर्केटा व्होन्ड्रोसोव्हाने माघार घेतल्याने कुड्रेमेटोव्हाला अंतिम फेरीसाठी पुढे चाल मिळाली. ओस्टापेंकोने आतापर्यंत डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेत दहाव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.
तिने इस्टबोर्न टेनिस स्पर्धेत विजेतेपद तर गेल्यावर्षी लक्झंमबर्ग टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. ओस्टापेंकोने या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना सोफीया किनेन, स्वायटेक तसेच झेकची सीडेड टेनिसपटू क्विटोव्हा आणि रूमानियाच्या हॅलेपचा पराभव केला आहे.
महिला दुहेरीच्या शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात युक्रेनच्या किचनॉक आणि लॅटव्हियाच्या ओस्टापेंकोने भारताची सानिया मिर्झा व झेकची लुसी हर्डेका यांचा 2-6, 6-2, 10-7 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. 2013 साली सानिया मिर्झाने अमेरिकेच्या बेथेनी सँड्ससमवेत या स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद पटकाविले होते. यावेळी या स्पर्धेत सानिया आणि हर्डेका यांना दुहेरीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता.