टोमलानोविक, टेलर फ्रिट्झ, ऍनिसिमोव्हा यांचीही आगेकूच, नाकाशिमा, बेडोसा, कॉर्नेट पराभूत
वृत्तसंस्था/ लंडन
माजी विजेती सिमोना हॅलेप, अमांदा ऍनिसिमोव्हा, राफेल नदाल, निक किर्गीओस, टेलर, फ्रिट्झ, क्रिस्तियन गॅरिन, ऍला टोमलानोविक यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला तर अमेरिकेचा ब्रॅन्डन नाकाशिमा, पॉला बेडोसा, ऍलिझ कॉर्नेट यांचे आव्हान चौथ्या फेरीत समाप्त झाले.
हॅलेपने पाचव्यांदा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना चौथ्या मानांकित पॉला बेडोसाचे आव्हान 6-1, 6-2 असे सहजपणे संपुष्टात आणले. 20 व्या मानांकित अमांदा ऍनिसिमोव्हाशी तिची उपांत्यपूर्व लढत होईल. ऍनिसिमोव्हाने टॅन हार्मनीची घोडदौड 6-2, 6-3 अशी रोखत 2019 नंतर प्रथमच ग्रँडस्लॅमची उपांत्यपूवं फेरी गाठली. 2019 मध्ये तिने प्रेंच ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. अन्य एका सामन्यात ऍला टोमलानोविकने ऍलिझ कॉर्नेटला पराभवाचा धक्का देताना 4-6, 6-4, 6-3 असा विजय मिळविला. अतिशय चुरशीचा झालेला हा सामना अडीच तासाहून अधिक काळ रंगला होता. 29 वर्षीय टोमलानोविक सलग दोनदा विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी ऑस्ट्रेलियाची गेल्या दोन दशकातील पहिलीच खेळाडू बनली आहे. मागच्या वर्षी तिला उपांत्यपूर्व फेरीत तिचीच देशवासी ऍश बार्टीने हरविले होते. यावेळी तिची उपांत्यपूर्व लढत कझाकच्या 17 व्या मानांकित एलेना रीबाकिनाशी होईल.
पुरुष एकेरीत स्पेनच्या राफेल नदालने 21 व्या मानांकित बोटिक व्हान डी झांडस्कल्पचा पराभव केला. सेंटर कोर्टवर झालेल्या या लढतीत नदालने 6-4, 6-2, 7-6 (8-6) असा विजय मिळविला. त्याची उपांत्यपूर्व लढत अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झशी होईल. 11 व्या मानांकित फ्रिट्झने याआधी ग्रँडस्लॅममध्ये एकदाही उपांत्यपूर्व फेरी गाठली नव्हती. यावेळी त्याने ही मालिका खंडित करताना ऑस्ट्रेलियाच्या पात्रता फेरीतून आलेल्या जेसन कुबलरवर 6-3, 6-1, 6-4 असा विजय मिळविला.
ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओसने अमेरिकेच्या 20 वर्षीय ब्रँडन नाकाशिमाचे आव्हान संपवताना पाच सेट्सच्या झुंजार लढतीत 4-6, 6-4, 7-6 (7-2), 3-6, 6-2 असा विजय मिळविला. तीन तास दहा मिनिटे ही झुंज रंगली होती. या मोसमातील हा त्याचा ग्रासवरील 13 सामन्यातील 11 वा विजय होता. चिलीच्या क्रिस्तियन गॅरिननेही शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविताना अतियश चुरशीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स डी मिनॉरचा पराभव केला. दोन सेट्स आणि 3-0 असे पिछाडीवर पडल्यावर आणि दोन मॅच पॉईंट्स वाचवत त्याने डी मिनॉरवर 2-6, 5-7, 7-6 (7-3), 6-4, 7-6 (8-6) अशी मात केली. चार तास 34 मिनिटे प्रेक्षकांना या दर्जेदार टेनिस लढतीचा आनंद घेता आला. गॅरिनची पुढील लढत निक किर्गीओसशी होणार आहे.
सानिया मिर्झा मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत
मिश्र दुहेरीत भारताची सानिया मिर्झा व तिचा क्रोएशियन साथीदार मेट पॅव्हिक यांनी उपांत्य फेरी गाठली असून त्यांनी चौथ्या मानांकित गॅब्रिएला डाब्रोवस्की व जॉन पीयर्स या कॅनडा-ऑस्ट्रेलियन जोडीवर 6-4, 3-6, 7-5 अशी मात केली. सुमारे पावणेदोन तास ही लढत रंगली होती. सातवे मानांकित रॉबर्ट फराह व एलेना ओस्टपेन्को आणि दुसरे मानांकित नील स्कुपस्की व डिजायरे क्रॅवझीक यांच्यातील विजयी जोडीशी त्यांची पुढील लढत होईल. सानियाची ही या स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी तिने 2011, 2013, 2015 मध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. या मोसमानंतर ती निवृत्त होणार असल्याने या स्पर्धेत जेतेपद मिळविण्याची तिला ही शेवटची संधी आहे.