बुंदेस्लिगा फुटबॉल : बायर्न म्युनिच, बोरुसिया डॉर्टमंड यांचेही विजय
वृत्तसंस्था/ बर्लिन
सलग दुसऱया सामन्यात काई हॅवर्ट्झने नोंदवलेल्या दोन गोलांच्या बळावर बायर लिव्हरकुसेनने बुंदेस्लिगामधील सामन्यात बोरुसिया मोन्चेनग्लाडबाचवर 3-1 अशा गोलफरकाने विजय मिळवित गुणतक्त्यात तिसऱया स्थानावर झेप घेतली.
मागील आठवडय़ापासून बुंदेस्लिगातील सामन्यांना सुरुवात करण्यात आली असून प्रेक्षकाशिवाय हे सामने खेळविले जात आहेत. मात्र या सामन्यावेळी प्रेक्षकांचा ‘फील’ यावा यासाठी ग्लाडबाच चाहत्यांचे सुमारे 20,000 कटआऊट्स स्टँड्समध्ये ठेवण्यात आले होते. ज्या चाहत्यांचे कार्डबोर्ड्स बनविण्यात आले होते, त्या प्रत्येक चाहत्याने आपली प्रतिमा वापरावी यासाठी 19 युरोज (सुमारे 1500 रुपये) व्यवस्थापनाला दिले होते.
या सामन्यात 20 वर्षीय हॅवर्ट्झने सातव्याच मिनिटाला गोल नोंदवून लिव्हरकुसेनला आघाडी मिळवून दिली. मात्र 52 व्या मिनिटाला मार्कस थुरमने बोरुसियाला बरोबरी साधून दिली. सहा मिनिटानंतर हॅवर्ट्झने पेनल्टीवर गोल नोंदवून लिव्हरकुसेनला पुन्हा आघाडीवर नेले. निको एलवेडीने करिम बेलारबीला पाडवल्याने त्यांना हा पेनल्टी मिळाला होता. 81 व्या मिनिटाला स्वेन बेन्डरने हेडरवर संघाचा तिसरा गोल नोंदवून विजय निश्चित केला. लिव्हरकुसेनने 53 गुणांसह तिसरे स्थान मिळविले असून बोरुसिया मोन्चेनग्लाडबाच 52 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
बायर्न म्युनिचची आघाडी कायम
बर्लिनमध्ये झालेल्या अन्य एका सामन्यात बायर्न म्युनिचने ईन्ट्राच फ्रँकफर्टचा 5-2 असा धुव्वा उडविला. या विजयानंतर बोरुसिया डॉर्टमंडवरील चार गुणांची आघाडी त्यांनी कायम ठेवली आहे. बायर्नने आघाडीचे कायम ठेवले असून अद्याप सात सामने व्हावयाचे आहेत. लिऑन गोरेत्झ्का, थॉमस म्युलर, रॉबर्ट लेवान्डोवस्की यांनी एकेक गोल नोंदवून 3-0 अशी आघाडी घेतल्यावर त्यांना सामना जिंकलाय असेच वाटत होते. पण प्रँकफर्टचा डिफेंडर मार्टिन हिंटेरेगरने लिव्हरकुसेनच्या बचावातील त्रुटीचा लाभ उठवित तीन मिनिटांत 2 गोल नोंदवले. मात्र अल्फोन्सो डेव्हिसने 60 व्या मिनिटाला बायर्नचा चौथा गोल केला आणि 74 व्या मिनिटाला हिंटेरेगरने स्वयंगोल करीत बायर्नला पाचवा गोल बहाल केला. बायर्नचे 61 तर बोरुसिया डॉर्टमंडचे 57 गुण झाले आहेत.
बोरुसिया डॉर्टमंड विजयी
बोरुसिया डॉर्टमंडने व्हीएफएल वुल्फ्सबर्गचा 2-0 असा पराभव केला. राफएल गुरेरो व अश्रफ हकिमी यांनी हे गोल नोंदवले. 32 व्या मिनिटाला गुरेरोने थॉर्गन हॅझार्डने पुरविलेल्या पासवर गोल नोंदवला तर 78 व्या मिनिटाला हकिमीने जेडन सांचोने निर्माण केलेल्या संधीवर दुसरा गोल नोंदवून विजयाचे तीन गुण निश्चित केले. डॉर्टमंडचा पुढील सामना मंगळवारी बायर्न म्युनिचशी होणार आहे. वुल्फ्सबर्गचा हा आठ लीग सामन्यातील पहिला पराभव असून या सामन्यात फेलिक्स क्लॉसला रेड कार्ड मिळाल्याने त्यांना दहा खेळाडूनिशी खेळावे लागले होते.