नंदगड पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
हेब्बाळ (ता. खानापूर) जवळ झालेल्या मोटार सायकल अपघातात हिंदूनगर, टिळकवाडी येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून नंदगड पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
यश परेश देशपांडे (वय 20) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून त्याच्या पश्चात आई, वडिल, आजी, आजोबा असा परिवार आहे. दि. 24 ऑक्टोबर रोजी मोटार सायकलवरुन पडून हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
उपचाराचा उपयोग न होता रात्री त्याचा मृत्यू झाला. नंदगड पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली असून खानापूरचे मंडल पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी पुढील तपास करीत आहेत.