ऑनलाईन टीम / गुवाहाटी :
आसामचे नवे मुख्यमंत्री म्हणून हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात भाजपमध्ये झालेल्या बैठकांच्या फेरीनंतर शर्मा यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब झाले. आसामचे निरीक्षक म्हणून पाठवण्यात आलेले केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर शर्मा उद्या (सोमवारी) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती दिली.
126 सदस्यांच्या आसाम विधानसभेत भाजपने 60 जागा जिंकल्या आहेत, तर आघाडीचा भागीदार असलेल्या आसाम गण परिषदेला नऊ जागा मिळाल्या असून, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलने सहा जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. भाजपच्या हायकमांडने सर्वानंद सोनोवाल आणि हेमंत बिस्वा शर्मा यांना नव्या मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेण्यासाठी दिल्लीला बोलावले होते. दोन्ही नेत्यांनी काल दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. तत्पूर्वी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आपला राजीनामा राज्यपाल जगदीश मुखी यांना सादर केला होता.
हेमंत बिस्वा शर्मा आज संध्याकाळी राज्यपाल जगदीश मुखी यांना भेटणार असल्याची माहिती आहे.