शेअर बाजारात सध्या तीव्र चढउतार होत असले तरी निफ्टीने 15 हजारांची आणि सेन्सेक्सने 50 हजारांची पातळी कायम राखली आहे. केंद्र सरकार आत्मनिर्भर आणि निर्गुंतवणूक कार्यक्रमाला वेगाने गती देत आहे. त्याचे लाभार्थी शोधून त्यात गुंतवणूक करुन नफा मिळवणे गरजेचे आहे. वाढता महागाई दर, कोरोनाचा चढता आलेख, बॉण्ड यिल्डमधील तेजी, औद्योगिक उत्पादनातील घसरण आदींचे नकारात्मक परिणाम बाजारावर जाणवणार असल्याचे संकेत आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणावरही नजर ठेवा.
गेल्या दोन आठवडय़ांपासून शेअर बाजारात दिसून येणारी अस्थिरता, चढउतार गतसप्ताहात अधिक तीव्रतेने दिसून आली. सकाळी बाजाराची सुरुवात चढत्या भाजणीने , दुपारी पुन्हा तीव्र घसरण आणि अखेरीस बाजार संपता संपता रिकव्हरी असा जणू एक पॅटर्नच असल्यासारखा प्रकार गेल्या आठवडय़ात दिसला. असे असले तरी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींच्याही आधार पातळय़ा (सपोर्ट लेव्हल) चांगल्या स्तरावर कायम राहिल्या. 12 मार्च रोजी सेन्सेक्स 487.43 अंकांनी घसरुन 50,792.08 अंकावर बंद झाला; तर निफ्टी तब्बल 143 अंकांनी घसरुन 15,030.95 अंकावर बंद झाला. बँक निफ्टीमध्ये 441 अंकांची, तर मिडकॅप निफ्टी 111 अंकांनी घसरला. विशेष म्हणजे निफ्टी स्मॉल 100मध्ये 43.55 अंकांची वाढ दिसून आली. सेन्सेक्सने 50,700 आणि निफ्टीने 15,000 चा टप्पा कायम राखला आहे, ही यातील जमेची बाजू. शुक्रवारच्या घसरणीला महाराष्ट्रासह देशात कोरोनासंसर्गाचा झपाटय़ाने वाढत चाललेला आलेख, अमेरिकन बॉण्ड यिल्डमधील तेजी ही प्रमुख कारणे होती. याखेरीज हाँगकाँग, युरोपियन बाजारातील घसरणीचाही नकारात्मक परिणाम दिसून आला. गतसप्ताहात आयटी क्षेत्रातील समभागांनी सर्वाधिक परतावा दिला.
चालू आठवडय़ाचा विचार करता, शुक्रवारी आलेल्या महागाईच्या आणि औद्योगिक उत्पादनाच्या आकडय़ांचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून येण्याची शक्यता आहे. देशातील औद्योगिक उत्पादन पुन्हा घसरताना दिसत आहे. जानेवारी महिन्यातील औद्योगिक उत्पादन निर्देशांक उणे 1.6 टक्के नोंदवला गेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची कामगिरी उणे 2 राहिली आहे; तर महागाईचा दर 5.03 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई दरातील वाढ ही व्याजदरवाढीस कारणीभूत ठरू शकते. दुसरीकडे, अमेरिकेतील ज्यो बायडेन सरकारने 1.3 ट्रिलियन डॉलर्सच्या पॅकेजवर शिक्कामोर्तब केले असले तरी आता 17 मार्च रोजी जाहीर होणाऱया युएस फेडरल पॉलिसीच्या बैठकीवर बाजाराची नजर असेल.
एक गोष्ट लक्षात ठेवावी की, शेअर बाजारात कितीही मोठी घसरण झाली किंवा अस्थिरता राहिली तरी चालू वर्षी बाजार नवा उच्चांक प्रस्थापित करणार आहे. त्यामुळे कोणत्याही घसरणीच्या काळात पडलेल्या किमतींचा फायदा घेत चांगल्या कंपन्यांचे समभाग खरेदी करावेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही सुसंधी असते. फटका किंवा जोखीम असते ती इंट्रा डे करणाऱया, अशा अस्थिरतेच्या काळात इंट्रा ट्रेडिंग करणाऱयांनी सावध राहणेच हिताचे.
गुंतवणुकीच्या किंवा अल्प-मध्यम-दीर्घकालीन नफ्याच्या दृष्टीने पाहता शेअर बाजारात निश्चितपणाने काही समभाग येत्या काळात दमदार परतावा देऊ शकतात. केंद्र सरकार आयडीबीआय बँकेतील हिस्सा विकणार आहे. पुढील आठवडय़ात या निर्गुंतवणुकीकरणाला मंजुरी मिळेल. त्यानंतर बँकेच्या समभागात मोठी तेजी दिसून येईल. गेल्या आठवडय़ात आरबीआयने पीसीएमधून या बँकेला मुक्त केल्यानंतर या बँकेच्या समभागात जवळपास 12 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. दिवसाअखेरीस ती 9.80 टक्क्यांवर आली. आज हा समभाग 42 रुपयांना आहे. चालू आठवडय़ासाठी तसेच दीर्घकालीन दृष्टय़ा या समभागाची आवर्जून खरेदी करावी. विमा कायद्यात बदल करुन 74 टक्के परदेशी गुंतवणुकीला मान्यता दिल्याने सरकारी विमा कंपन्यांत तेजी दिसून आली आहे. त्यादृष्टीने विचार करता न्यू इंडिया ऍश्युरन्सचा समभाग येणार्या काही दिवसांत आणखी वधारेल यात शंका नाही. केंद्र सरकारने धोरणात्मक बदलांना गती दिली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ला चालना देण्यासाठी सरकार विविध क्षेत्रातील परदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्यासाठी येथील कंपन्यांकडून साधनांची खरेदी करण्याची सक्ती करत आहे. टेलिकॉम क्षेत्राबाबत असा निर्णय झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील डी-लिंकसारख्या समभागात तेजी दिसून आली आहे. 111.36 रुपयांचा हा समभाग येत्या काळात 120 पर्यंत पोहोचू शकतो. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव गेल्या आठवडय़ात काही काळ गडगडल्याने ओएनजीसीच्या समभागात मोठी घसरण झाली. परंतु शुक्रवारी तेलाच्या किमती वधारल्याने हा समभागही वधारला आहे. 115 रुपयांच्या या समभागासाठी जेपी मॉर्गनने दिलेले लक्ष्य 190 रुपये इतके आहे. त्यामुळे सद्यस्थितीत हा समभाग आवर्जून खरेदी करावा. सध्या उन्हाळय़ाचे दिवस सुरु झाल्याने वीजेची मागणी वाढत आहे. त्यामुळे ऊर्जाक्षेत्रातील, वीजक्षेत्रातील सर्वच समभागात तेजी दिसून येत आहे. जेन्सस पॉवरचा समभाग 52.55 रुपयांवर आहे. त्याची खरेदी योग्य वेळ साधून करुन ठेवावी. याखेरीज टाटा पॉवर ही ऊर्जाक्षेत्रातील महत्त्वाची कंपनी आहे. अलीकडेच टेस्ला या जगविख्यात वाहननिर्मिती कंपनीबरोबर विद्युत वाहनांसाठीच्या चार्जिंग स्टेशनसंदर्भात टाटा पॉवरची बोलणी सुरु आहेत. सध्याच्या घडीला 113.25 रुपयांवर असणारा हा समभाग आगामी काळात 120 रुपयांचा टप्पा पार करु शकतो.
याखेरीज विदेशी ब्रोकरेज हाऊसेसनी काही समभागांसाठीचे लक्ष्य काय ठेवले आहे, यावरही आपली नजर असणे आवश्यक आहे. त्यानुसार, इंडसइंड बँकेसाठी सीएलएसएने पूर्वीचे 1100 रुपयांचे टार्गेट वाढवून 1325 रुपये केले आहे, तर मदरसन सुमी सिस्टीम्ससाठीचे लक्ष्य 250 रुपयांवरुन वाढवून 285 रुपये केले आहे. सीएलएसएने ओबेरॉय रिऍलिटीचे लक्ष्य 625 रुपये केले आहे. नव्या प्रकल्पांच्या लाँचिंगमुळे 2021 ते 2023 या काळात कंपनीची विक्रीवृद्धी 19 टक्क्यांहून अधिक राहील, असा अंदाज आहे. अदानी पोर्ट्चा समभाग सध्या प्रचंड तेजीत आहे. हाऊस सिटी ब्रोकरेज हाऊसने या शेअरसाठीचे रेटिंग वाढवले असून लक्ष्य 935 रुपये केले आहे. सध्या हा समभाग 728.15 रुपयांवर आहे. अलीकडेच कंपनीने दोन कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. तसेच कंपनीचा कॅश फ्लोही चांगला आहे आणि ताळेबंदही मजबूत आहे. त्यामुळे आपल्या पोर्टफोलियोमध्ये हा समभाग असायलाच हवा.
गेल्या चार-सहा महिन्यात बाजारात दाखल झालेल्या आयपीओंनी धमाकेदार कामगिरी केली आहे. चालू आठवडय़ात अनुपम रसायन, लक्ष्मी ऑरगॅनिक्स, कल्याण ज्वेलर्स, नजारा टेक, क्राफ्टस्मन ऑटोमेशन, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक या कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होत आहेत. या सर्वच कंपन्यांचे फंडामेंटल्स पाहिल्यास ते मजबूत आहेत.