ऑनलाईन टीम / अंतानानारिओ :
आफ्रिकेतील मादागास्करमधील एका बेटाच्या किनाऱ्यावर सोमवारी बचाव पथकाचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरमध्ये देशाचे मंत्री सर्ज गेले देखील होते. त्यामुळे त्यांचाही मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मंगळवारी सर्ज गेले पुन्हा किनाऱ्यावर दाखल झाले. गेले यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते आपला जीव वाचविण्यासाठी 12 तास समुद्रात पोहत होते. ‘माझ्या मृत्यूची अद्याप वेळ आली नव्हती’, अशी प्रतिक्रिया गेले यांनी रुग्णालयात दाखल झाल्यावर दिली आहे.
मादागास्करच्या पूर्वोत्तर भागात फ्रांसिया नावाचे मालवाहू जहाज सोमवारी पहाटे बुडाले होते. या जहाजातून 130 लोक अवैधपणे प्रवास करत होते. त्यामधील 17 लोकांचा मृत्यू झाला. 68 जण बेपत्ता होते. तर 45 जणांना वाचविण्यात यश आले होते. त्यामुळे सोमवारी सकाळी उत्तर पूर्व किनाऱ्यावर एका जहाजाचे अवशेष असलेल्या भागाचे निरीक्षण करण्यासाठी बचाव पथकाच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. या हेलिकॉप्टरमध्ये देशाचे मंत्री सर्ज गेले देखील होते. दरम्यान, उड्डाणानंतर काही काळातच हे विमान समुद्रात कोसळले. या दुर्घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरमध्ये असलेले मंत्री सर्ज गेले यांनी 12 तास पोहून आपला जीव वाचवला. मंगळवारी ते किनाऱ्यावर आले तेव्हा त्यांचे अंग थंड पडले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.