वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चिनी आगळीक सुरूच आहे. पँगोंग सरोवरासंबंधी भारतासोबत तडजोड झाल्यावरही चीनने सरोवराला लागून असलेल्या भागात पक्के बांधकाम केले आहे. चीनने तेथे हेलिपॅड तयार केले असल्याचा खुलासा उपग्रहीय छायाचित्रांद्वारे झाला आहे.
ही छायाचित्रे जॅक डिट्च नावाच्या पत्रकाराने पोस्ट केली आहेत. जॅक हा अमेरिकेच्या फॉरेन पॉलिसी नियतकालिकासाठी काम करतो. पँगोंग सरोवराच्या उत्तर काठाची ही छायाचित्रे असून यात चिनी जेटी (बोट), संभाव्य हेलिपॅड आणि स्थायी बंकर दिसून येतो.
पँगोंग सरोवराच्या फिंगर 8 चा भाग तणावापूर्वीपासूनच चीनच्या नियंत्रणात आहे. आता मे 2020 मध्ये तणावानंतर स्थिती सुरळीत होण्यास प्रारंभ झाल्यावर भारतीय आणि चिनी सैन्याने पँगोंगच्या उत्तर आणि दक्षिण काठावरून सैनिकांना मागे घेण्याबद्दल सहमती दर्शविली होती. यात फिंगर 4 पासून फिंगर 8 पर्यंतचा भाग सामील होता. ज्या हिस्स्यासाठी तडजोड झाली होती, त्याला लागून असलेल्या भागात चीनने हे पक्के बांधकाम केल्याचे समजते.
चिनी आगळीकीला भारताने चोख प्रत्युत्तर दिल्याने ड्रगनला या भागात माघार घ्यावी लागली होती. नियंत्रण रेषेवर चीनकडून मोठय़ा संख्येत सैनिक तैनात केल्यावर भारतानेही तेथे भक्कम सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. तिबेटमध्ये चीनने स्वतःची शस्त्रसामग्री जमा केली असल्याने भारतानेही लडाखमध्ये विशेष तयारी चालविली आहे.