लेखिका सोनाली नवांगुळ यांचा ‘भरारी’ पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर : प्रतिनिधी
पुनर्वसन व समावेशनाद्वारे दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी गेली 37 वर्षे कार्यरत असलेल्या हेल्पर्स ऑफ दि हॅन्डीकॅप्ड, कोल्हापूर या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या अपंगमित्र आणि भरारी पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष पी.डी. देशपांडे यांनी सोमवारी केली. प्रतिष्ठेच्या अपंगमित्र पुरस्कारासाठी ग्रामीण भागात केलेल्या मुलभूत तंत्रज्ञानाच्या प्रसारकार्यासाठी पुण्याच्या अनिता दांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अपंगत्वावर मात करून साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूरच्या लेखिका सोनाली नवांगुळ यांना `भरारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
येथील समर्थ विद्यालय शाळेच्या प्रांगणात रविवार 5 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत तर नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
याच कायर्क्रमात गेल्या दोन वर्षात 10 वी व 12 वी परीक्षेत सुयश संपादन करणाऱया संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांना 80 हजार रूपये रकमेचे रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. संस्थेच्या काही हितचिंतकांनी त्यांच्या प्रियजनांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार संस्थापित केले आहेत, अशी माहिती संस्थेच्या सचिव तेजश्री शिंदे व संघटक रेखा देसाई यांनी दिली आहे. वयाच्या तिसऱया वर्षी पोलिओमुळे दोन्ही पायांनी अपंगत्व आलेल्या संस्थेच्या दीपक कुशाप्पा पोवार या गुणवंत कर्मचाऱ्याचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात येणार आहे.