बेंगळूर/प्रतिनिधी
हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणे आता महागात पडू शकते. परिवहन विभाग आता अशा वाहनचालकांचा दंडासह तीन महिन्यांकरिता वाहन चालक परवाना रद्द करणार असून त्याची काटेकोरपणे अंलबजावणी करण्याची तयारी करत आहे.
राज्यात १.६५ कोटी नोंदणीकृत दुचाकी वाहने असून त्यापैकी सुमारे ६० लाख बेंगळूरमध्ये आहेत. दरम्यान मोटार वाहन कायद्यात २०१९ च्या दुरुस्तीनंतर हेल्मेटशिवाय दुचाकी चालविल्याबद्दल एक हजार रुपयांच्या दंडासह तीन महिने वाहन परवाना रद्द करण्याची तरतूद आहे. पण नागरिकांच्या विरोधानंतर सरकारने दंडाची रक्कम ५० टक्क्यांनी कमी करून ५०० रुपयांवर आणली, परंतु परवाना निलंबित करण्याची तरतूद अद्याप लागू केलेली नाही. सध्या मद्यधुंद चालकाचा केवळ परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला जात आहे. सुधारित नियमांनुसार, दुचाकी वाहनांवर दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी हेल्मेट असणे अनिवार्य आहे.
यावर्षी सप्टेंबरपर्यंत विना हेल्मेट वाहन चालविल्या प्रकरणी सुमारे २०.७ लाख प्रकरणे नोंदविण्यात आली असून यामध्ये मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट न घातल्या प्रकरणी सुमारे १२.५ लाख गुन्हे नोंदविण्यात आली आहे. दरवर्षी अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.