बेळगाव / प्रतिनिधी
हुबळी इलेक्ट्रीसिटी सप्लाय कंपनी (हेस्कॉम)ने केईआरसी (कर्नाटक इलेक्ट्रीसिटी रेग्युलेटरी ऍथॉरिटी) कडे वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठविला आहे. यावषी प्रति युनिट 45-52 पैसे दरवाढ करण्याचा हा प्रस्ताव आहे. घरगुती वापराबरोबरच औद्योगिक क्षेत्रासाठी ही दरवाढ असणार आहे. यामुळे लवकरच वीज दरवाढीचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे.
केईआरसीकडून प्रत्येक वषी 1 एप्रिलपासून राज्यात विजेचे नवे दर लागू केले जातात. सध्या शहरी भागासाठी प्रति युनिट 5.20 रुपये तर औद्योगिक क्षेत्रासाठी 5.35 रुपये प्रति दराने वीज बिल आकारणी केली जाते. या नव्या प्रस्तावामुळे ती अनुक्रमे घरगुती वापरासाठी 5.65 रुपये तर औद्योगिक वापरासाठी 5.80 रुपये करण्यात येणार आहे. हेस्कॉमकडून प्रस्ताव आल्यानंतर त्यावर केईआरसी आपला अहवाल सादर करून अंतिम दराला मंजुरी देते.
ग्राहकांना बसणार फटका
घरगुती व औद्योगिक विजेच्या दरात वाढ होणार असल्यामुळे ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या आर्थिक मंदीमुळे औद्योगिक क्षेत्र डबघाईला आले असताना दुसरीकडे विजेच्या दरात वाढ केली जाणार असल्याने उद्योग क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विजेचा दर वाढवूनही विजेचा होणारा लपंडाव व योग्य दर्जाची विज दिली जात नसल्यामुळे उद्योजकांनी यापूर्वीही आपली नाराजी हेस्कॉमकडे व्यक्त केली आहे.