महिनाभरापासून समस्या, अधिकाऱयांचा मात्र कानाडोळा
प्रतिनिधी /बेळगाव
नवीन विद्युत कनेक्शन घेण्यासोबतच पैसे भरण्याच्या कामाला ब्रेक लागला आहे. मागील महिन्याभरापासून हेस्कॉमचे सर्व्हरडाऊन असल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत. याचा फटका ग्राहकांना बसत असून नवीन कनेक्शन मिळविण्यासाठी हेस्कॉमचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. परंतु याकडे अधिकाऱयांचा कानाडोळा होत असल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.
हेस्कॉमच्या सर्व्हरमध्ये वारंवार बिघाड होत आहे. यापूर्वीदेखील अनेकवेळा सर्व्हरडाऊन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नवीन घर बांधणी करणाऱया नागरिकांना टेम्पररी मीटरची आवश्यकता असते. परंतु मागील महिन्याभरापासून सर्व्हरचडाऊन असल्यामुळे मीटर मिळणे कठीण झाले आहे. यापूर्वीदेखील सर्व्हरडाऊन होत असल्याने त्याची तक्रार हेस्कॉमच्या एमडींकडे करण्यात आली होती. परंतु अद्यापही त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
नागरिकांना झिजवावे लागताहेत उंबरठे
अनेकांच्या घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्यांना कायमस्वरुपी मीटर घेणे गरजेचे आहे. हेस्कॉमकडे अर्ज करून महिना उलटला तरी अद्याप मीटर मिळालेला नाही. यामुळे नवीन घरांमध्ये जाणाऱयांना हेस्कॉमच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यांनी ठरविलेला मुहूर्तदेखील निघून गेल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. हेस्कॉमने आपल्या सर्व्हरमध्ये बदल करण्याची मागणीही केली जात आहे.
हेस्कॉमच्या अंतर्गत कामकाजालाही फटका
केवळ ग्राहकांनाच नव्हे तर सर्व्हरडाऊनमुळे हेस्कॉमच्या अंतर्गत कामकाजालाही फटका बसला आहे. बिलिंगसंबंधित कामेदेखील रखडली आहेत. तसेच तात्पुरते व कायमस्वरुपी मीटर देण्यासाठी कर्मचाऱयांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे कार्यालयातील कामकाज अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे.