कर्मचाऱयांच्या नेमणुका कंत्राटी पद्धतीने : मीटर रीडिंग कंत्राटदाराकडे
प्रतिनिधी/ बेळगाव
हेस्कॉमची वाटचाल आता खासगीकरणाकडे सुरू आहे. नव्याने करण्यात येणाऱया कर्मचाऱयांच्या नेमणुका कंत्राटी पद्धतीने केल्या जाऊ लागल्या आहेत. बरेच काम कंत्राटी पद्धतीने देण्यात येत आहे. नुकतेच शहर उपविभाग 1 चे वीज मीटर रीडिंगचे काम कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले आहे. कर्मचाऱयांची संख्या कमी असल्याने खासगी कंत्राट देण्यात आले असले तरी खासगीकरणाकडे हेस्कॉम वळत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्र सरकारने मागील काही महिन्यांपासून देशातील सर्व विद्युत मंडळांचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव आणला होता. कर्नाटक सरकारने हा प्रस्ताव फेटाळला होता. परंतु खासगीकरणाची टांगती तलवार आता कर्मचाऱयांवर आहे. याला कर्मचारीवर्गातून तीव्र विरोध केला जात आहे. खासगीकरण विरोधात बेळगावमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले होते.
यापूर्वी शहर उपविभाग 3 मध्ये मीटर रीडिंगचे काम खासगी कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. आता शहर उपविभाग 1 चे काम कंत्राटदाराकडे देण्यात आले. हेस्कॉमकडे मीटर रीडर नसल्याने लाईनमन पदावर असणाऱया कर्मचाऱयांनाच मीटर रीडर म्हणून काम देण्यात आले होते. कर्मचाऱयांची वानवा असल्याने अखेर हे कंत्राट देण्यात आले. तसेच 24 तास सेवा देणारे तक्रार निवारण कर्मचारीही खासगी कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले आहेत.
ग्रामीण भागात फिडर प्रँचायजी
हेस्कॉमने यापूर्वीच ग्रामीण भागातील मीटर रीडिंगचे काम कंत्राटी पद्धतीने सोपविले आहे. फिडर प्रँचायजी देण्यात आली असून फिडरनुसार कंत्राट देण्यात आले आहे. यामुळे नव्या कर्मचाऱयांची भरती करून घेण्यापेक्षा कंत्राट देण्यावरच हेस्कॉमचा भर असल्याचे दिसून येत आहे.
अरविंद गदगकर (साहाय्यक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम)
पॉवरमन कर्मचारी मीटरचे रीडिंग करीत असल्यामुळे कर्मचाऱयांची वानवा जाणवत होती. यासाठी शहर उपविभाग 1 मध्ये मीटर रीडिंगचे काम कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले आहे. त्या कर्मचाऱयांना दररोज अहवाल हेस्कॉमकडे द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.