आजकाल फिटनेसबाबत एकूणच जागरुकता वाढीस लागली आहे. विशेषतः तरुणाई मोठय़ा संख्येने जीममध्ये व्यायामासाठी जाण्यावर भर देत आहे. असं असलं तरी व्यायामाशी संबंधित बरेच गैरसमज आहेत. ते जाणून घेऊन दूर होणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने हा कानमंत्र लक्षात घ्यावा.
वय वाढल्यावर फार व्यायाम करू नये, असं अनेकांना वाटतं. त्यामुळे काही लोक ठरावीक काळानंतर व्यायाम थांबवतात. वय झाल्यामुळे वजन उचलता येणार नाही, असाही समज असतो. प्रत्यक्षात हे चुकीचं आहे. व्यायामामुळे वय वाढण्याची प्रक्रिया मंदावू शकते. तसंच जीवनशैलीशी संबंधित बरेच आजार नियंत्रणात राहू शकतात किंवा त्यांना प्रतिबंध करता येतो.
आजारपणात व्यायाम करू नये, असाही एक समज आहे. आजारी पडल्यावर शरीर दमतं. थकतं. पण अजिबात व्यायाम किंवा शारीरिक हालचाली करायची नाही असा याचा अर्थ होत नाही. अतिव्यायाम टाळणं गरजेचं आहे. पण थोडय़ा हालचालीमुळे तुम्ही लवकर बरे होऊ शकता.
फिट राहण्यासाठी तासभर व्यायाम करणं गरजेचं आहे, असंही अनेकांना वाटतं. पण प्रत्यक्षात काही मिनिटांचा व्यायामही तुम्हाला सगळे लाभ मिळवून देऊ शकतो. चालणं, धावणं, जिना चढणं अशा व्यायामांमुळेही तसंच घरातल्या कामांमुळेही तुमचा व्यायाम होऊ शकतो.
कामानिमित्त चालणं किंवा धावपळ करणं व्यायामासारखं आहे, असं अनेकांना वाटतं. पण तीव्र स्वरुपाच्या व्यायामाच्या यापेक्षा अधिक कॅलरी खर्च होतात. अर्थात ही हालचालही शरीरासाठी गरजेचं आहे.
मात्र यासोबतच व्यायाम करणंही गरजेचं आहे. व्यायाम केल्यामुळे अंग दुखेल, दुखापत होईल, स्नायू दुखतील म्हणून बरेच जण व्यायाम टाळतात. पण व्यायामामुळे होणारे लाभ लक्षात घेतले तर व्यायामाला पर्याय नाही, हेच खरं. योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास अंगदुखी, स्नायूदुखी अशा समस्या जाणवणार नाही.