ऑनलाईन टीम / पंढरपूर
गतवर्षीप्रमाणे यंदा ही आषाढीवारीवर कोरोनाचे सावट असून देशभरातून पंढरीला येणारे वारकरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करत यंदाची वारी घरचे घऱीच करणार आहेत.असे असले तरी प्रतीवर्षीप्रमाणे यंदा विठू माऊलीची महापूजा होणार आहे. या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान वर्धा जिल्ह्यातील केशव शिवदास कोलते (७१) व इंदूबाई केशव कोलते (६६) या दांम्पत्याला हा मान मिळणार आहे. हे दाम्पत्य गेले वीस वर्षे वारी करत असून संत तुकाराम मठ, वर्धा येथे राहतात. ते यंदा राज्यातील मुख्यमंत्र्यांसह महापूजेत सहभागी होतील.
|| बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल || करावा विठ्ठल जीवभाव || येणे सोसे मन झाले हावभरी ||
परत माघारी येत नाही || बंधनापासूनी उकलल्या गाठी || घेता आली मिठी सावकाश ||
या भावनेतून वारकरी दिंड्या पताकांसह चंद्रभागेतीरावरुन भजनात तल्लीन होत. मजल दरमजल करत विठ्ठूरायाच्या भेटीसाठी वारीत सहभागी होत. वाळवंटी रिंगणसोहळा खेळत पण यंदा याला मर्यादा असतील. गेल्या काही दिवसात वारकऱ्यांनी यासाठी भजनरुपी आंदोलने केली पण प्रशासनाने कोरोना नियमावलीचे कारण देत वारीवर मर्यादा घातल्या आहेत.